बीड : आर्थिक वर्षाचा अखेर अर्थात मार्च एंडमुळे सर्व लेखाजोखा पूर्ण करुन आलेला निधी खर्च करणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी शनिवारी (ता. २९) आठवडी सुटीचा दिवस असूनही बहुतांशी कार्यालये गजबजलेली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. शिस्तीच्या पवारांकडून जिल्हा नियोजन समितीचा मिळालेला सर्व निधी या दोन दिवसांत खर्च करण्याचे नियोजन सर्व शासकीय विभागांनी केले आहे. शनिवारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियेाजन समिती आदी सर्व कार्यालयांत नियमितसारखे कामे सुरु असल्याचे दिसले.
विशेषत: जिल्हा परिषद बांधकाम विभागाला मिळालेला निधी खर्च करण्यासाठी देयकांची तपासणी आणि अदा करण्याचे काम वेगाने सुरु होते. त्यातच आता मंगळवारी (ता. दोन) पवारांच्या बैठकीसाठीही तयारी करण्याची लगबग शासकीय कार्यालयांत सुरु होती.
जिल्हा नियेाजन समितीकडून विविध विभागांना दिलेला निधी मार्च अखेर पर्यंत खर्च झाला नाही तर तो परत जातो. त्यामुळे शेष कामे उरकण्याची घाई विविध कार्यालयांत दिसून आली.