AUS vs IND : रोहित-विराट ऑस्ट्रेलियाला पुन्हा जाणार, सूर्यकुमारही असणार, टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
GH News March 30, 2025 08:08 PM

टीम इंडियाने अवघ्या काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौरा केला. टीम इंडिया या दौऱ्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका गमावली. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हे दोघे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour Of Australia 2025) करणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धच्या 2 मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलिया मायदेशात टीम इंडियाविरुद्ध या दोन्ही मालिकांमध्ये एकूण 8 सामने खेळणार आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान एकूण 2 मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

8 शहरांत 8 सामने

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आयोजन हे 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या दोन्ही मालिकांमधील एकूण 8 सामने 8 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने अनुक्रमे पर्थ, अॅडलेड आणि सिडनीत आयोजित करण्यात आले आहेत. तर त्यानंतर कॅनबरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिसबेनमध्ये 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

  • 19 ऑक्टोबर, पहिला सामना, पर्थ (डे-नाईट)
  • 23 ऑक्टोबर, दुसरा सामना, एडलेड (डे-नाईट)
  • 25 ऑक्टोबर, तिसरा सामना, सिडनी (डे-नाईट)

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

  • 29 ऑक्टोबर, पहिला सामना, कॅनबेरा
  • 31 ऑक्टोबर, दुसरा सामना, मेलबर्न
  • 2 नोव्हेंबर, तिसरा सामना, होबार्ट
  • 6 नोव्हेंबर, चौथा सामना, गोल्ड कोस्ट
  • 8 नोव्हेंबर, पाचवा सामना, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलियाकडून होम सिजनचं वेळापत्रक जाहीर

रोहितकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्व

रोहित शर्मा वनडे टीम इंडियाचा कॅप्टन आहे. त्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. बॉर्डर गावसकर-ट्रॉफीनंतर रोहित आणि विराट या दोघांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या एकदिवसीय मालिकेमुळे दोन्ही दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचं या क्षणी तरी निश्चित मानलं जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.