आज मुंबई जिंकणार की ‘हार’ट्रिक , मुंबईच्या विजयाकडे मुंबईकरांचे लक्ष
Marathi March 31, 2025 08:24 AM

सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्सच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागलेत. गेल्या मोसमात मुंबईला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आणि त्यानंतर ते मान वर काढू शकले नव्हते. त्यामुळे कोलकात्याविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर लढणार आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांच्या चेहऱयावर एकच प्रश्न उभा राहिलाय, आज तरी जिंकणार ना… की ‘हार’ट्रिक. जर वानखेडेवर मुंबईला आपल्या खात्यात विजयाचे गुण नोंदविता आले नाही तर मुंबई आतापासूनच प्ले ऑफपासून एकेक पाऊल दूर जात राहील.

गेल्या मोसमात मुंबईला केवळ चार सामने जिंकता आले होते. कारण स्पर्धेची सुरुवात पराभवाच्या हॅटट्रिकने झाली होती आणि त्यानंतर आयपीएलमधून बाद होणारा सर्वात पहिला संघही मुंबईच ठरला होता. याची पुनरावृत्ती मुंबईला आता नकोय. पण मुंबईच्या खेळातून याची एकही झलक गेल्या दोन्ही सामन्यांत दिसू शकलेली नाही. त्यामुळे सारेच चेहरे चिंताग्रस्त झालेत.

रोहितची आज फटकेबाजी

मुंबईचे चाहते चातकाप्रमाणे रोहित शर्माच्या झंझावाताची वाट पाहाताहेत. चेन्नईविरुद्ध भोपळा फोडल्यानंतर गुजराजविरुद्धही त्याची खेळी आठवर अडकली. रोहितचा खेळ दिवसेंदिवस आपली विश्वासार्हता गमावतोय. त्याची फलंदाजी लॉटरी ठरतेय. जी नशीब असेल तेव्हाच लागते. खेळपट्टीवर बॅट घेऊन दहा मिनिटेही रोहितला उभे राहणे कठीण झालेय. जर रोहितला वानखेडेवर आपल्या बॅटचा खेळ दाखवता आला नाही तर त्यालाही मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. रोहितचे वय वाढतेय, त्याच्या हालचालीही मंदावत चालल्या आहेत. रोहितची वैयक्तिक कामगिरी किती खालावलीय, हे आता कुणीही सांगू शकतो.

कोलकात्यासाठी डिकॉक महत्त्वाचा

क्विंटन डिकॉकची बॅट जेव्हा तळपते तेव्हा त्याचा संघ हमखास जिंकतो. परवा डिकॉकने नाबाद 97 धावा केल्या आणि त्याने राजस्थानचा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात डिकॉकला केवळ चार धावाच काढता आल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणेही कोलकात्याच्या फलंदाजीचा कणा आहे. पण उद्या सुनील नरीनची उपस्थिती कोलकात्याला आणखी बळकटी देऊ शकेल. गेल्या सामन्यात नरीन नव्हता. गोलंदाजीत वरुण चक्रवर्थीची फिरकी मुंबईसाठी फार घातक ठरू शकते. जितकी फलंदाजी घातक आहे तितकीच कोलकात्याची गोलंदाजी सामान्य आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.