Kullu Landslide : हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ६ मृत्यू
esakal March 31, 2025 09:45 AM

कुलू : हिमाचल प्रदेशातील कुलू येथे आज संध्याकाळी दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुलूमधील मणिकरन साहिब गुरुद्वारासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यावर संध्याकाळी काही नागरिक बसलेले असतानाच पाच वाजताच्या सुमारास दरड कोसळली. दरडीमुळे डोंगर उतारावरील मोठे वृक्ष उन्मळून घरंगळत खाली आले आणि नागरिक व पर्यटक त्याखाली दबले गेले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तिघी महिला आहेत.

मृतांमध्ये एका मोटार वाहनचालकाचाही समावेश आहे. या घटनेनंतर पोलिस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या १५ जणांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरड कोसळल्याने घरांचे आणि रस्त्याचेही नुकसान झाले आहे. दरड रस्त्यावरच कोसळल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. हा राडारोड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मार्चच्या सुरुवातीला जोरदार पाऊस आणि हिमवर्षावामुळे हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.

राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मदतकार्यात वेग आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, दरड कोसळलेला भाग तीव्र उताराचा असल्याने ढिगाऱ्यांखाली दबलेल्यांचा शोध घेणे जिकीरीचे ठरत आहे. तसेच, येत्या काही तासांत पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सावधगिरीची सूचना दिली असून रुग्णालयांनाही सज्ज राहण्यास सांगितले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.