Maharashtra Live Updates : वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण
Sarkarnama April 01, 2025 02:45 AM
Walmik Karad : बीडच्या तुरुंगात बाचाबाची

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती आहे. कराड आणि घुले हे दोघे सध्या बीडच्या तुरुंगात आहेत, त्यांच्या अंगावर काही कैदी धावून गेल्याची माहिती मिळत आहे.

औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक - संघाच्या नेत्याने फटकारले

औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला म्हणून त्याची कबर इथे आहे. हा विषय अनावश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आखिल भारतीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी सत्ताधारी नेत्यांना फटकारले आहे.

येत्या आठवड्यात मिळणार भाजपला नवा अध्यक्ष?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. पक्षाच्या स्थापनादिनापूर्वी अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींचा राजकीय वारसदार निवडण्याची वेळ आलेली नाही - फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार निवडण्याची वेळ आलेली नाही, वडील जिवंत असताना वारसदार निवडण्याची आपली संस्कृती नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण? या प्रश्नावर उत्तर दिले.

राज ठाकरेंच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचार करू - फडणवीस

राज्य चांगले चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुचविलेल्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचार करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ईदच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-फितरच्या शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की हा सण आपल्या समाजात आशा, एकता आणि दयाळूपणाचा संदेश पसरवो. ईद मुबारक!

कुणाल कामरा आज पोलिसांसमोर हजर राहणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार करणाऱ्या कुणाल कामरा याला कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र, खार पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हामध्ये जबाब नोंदवण्यासाठी तो आज हजर राहण्याची शक्यता आहे.

ॉ चलो बिहार, प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासंदर्भात महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येईपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील, असे सांगत चलो बिहार असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

Maharashtra Kesari : वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी

‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’च्या मान्यतेने कर्जतमध्ये घेण्यात आलेली ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळके याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या चांदीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेने पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.