धुळे : गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करणे कायदेशीर गुन्हा असताना देखील सर्रासपणे अनधिकृतपणे सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असतो. अशाच प्रकारे धुळ्यात अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करत कारवाई केली आहे. याठिकाणी गर्भपात करण्याच्या तयारीत असलेल्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील साक्रीरोड परिसरातील सोनोग्राफी सेंटरवर सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्रावर धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने छापा टाकत आज कारवाई केली आहे. एका सांकेतिक स्थळावर प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला या अनधिकृत गर्भपात केंद्र संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आदेशित करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने हि कारवाई केली आहे.
गर्भपात करण्याची सुरु होती तयारी
धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही छापेमारी मोहीम करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला असता या ठिकाणाहून गर्भपात केलेले एक स्त्री जातीचे अर्भक आणि आणखी दुसरे गर्भपात करण्याच्या तयारीत असलेली गर्भवती महिला देखील पथकास आढळून आली आहे. पथक धडकताच केंद्रावर एकच खळबळ उडाली होती.
महिला डॉक्टर ताब्यात
सदर ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात करताना लागणारे सर्व साहित्य देखील पथकाला आढळून आले असून हे सर्व साहित्य प्रशासनातर्फे जप्त करण्यात आले आहे. तसेच येथील महिला डॉक्टरला पथकाने ताब्यात घेतले असून या गर्भपात केंद्राच्या चालकांवर पुढील कारवाई करण्याचे काम अजून सुरूच आहे.