Murud Crime : करकट्टा येथील खून प्रकरणातील आरोपी महिलेने संपविले जीवन
esakal April 01, 2025 04:45 AM

मुरुड - अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याच्या प्रकरणातील सहआरोपी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. सदरील महिलेने आत्महत्या केली आहे की काही घातपात घडला आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान इंगळे यांच्या काल झालेल्या खून प्रकरणातील पाच पैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून करकट्टा, ता. लातूर येथे रविवार ता. 30 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शरद प्रल्हाद इंगळे (वय-40 वर्ष) यांचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सोनट्या उर्फ रोहन बाळासाहेब शिंदे याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने गळ्यावर व डोक्यात वार करून खून केला होता.

या प्रकरणात मुरुड पोलीस स्टेशनमध्ये रोहन बाळासाहेब शिंदे तसेच त्याला सहकार्य केल्याच्या संशयावरून रोहित उर्फ दाद्या बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब भारत शिंदे, गणेश भारत शिंदे व सखुबाई बाळासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी गणेश भारत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान आज सकाळी सहा वाजता करकट्टा येथील वनीकरणाच्या जागेत अज्ञात महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरील महिला ही शरद इंगळे यांच्या खुनातील आरोपी पैकी एक असल्याचे समजले.

मुरुड पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सदरील महिलेने आत्महत्या केली आहे की काही घातपात घडला आहे.

याबाबत ही पोलीस तपास करत आहेत. कालच्या खून प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उर्वरित आरोपींना अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या.

खून झालेला मयत शरद इंगळे याच्यावर आज करकट्टा येथे अंत्यविधी करण्यात आला तर गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेवर लातूर येथे महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.

दोन हजार लोकवस्तीच्या छोट्याशा गावात दोन दिवसात घडलेल्या खून आत्महत्या सारख्या घडामोडीमुळे गावांमध्ये खळबळ उडाली असून, दबक्या आवाजात सर्वत्र याच गोष्टीची चर्चा करताना गावकरी दिसत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.