राहुरी : वरवंडी येथे फायटर विमानातून निसटलेला बॉम्ब जमिनीत सात फूट खोल रुतला. त्यामुळे सहा फूट खोलीवरील शेतकऱ्यांच्या चार सायफनच्या जलवाहिन्या फुटल्या. घटनेला सात दिवस उलटले. बॉम्ब जिवंत असल्याने जलवाहिन्या जोडण्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांची शेवटच्या एका पाण्यावर आलेली पिके जळायला लागली आहेत.
वरवंडी येथे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू लागवड प्रकल्पाच्या जमिनीवर फायटर विमानातून एक बॉम्ब निसटला. दीडशे फूट माती उंच उडाली. जमिनीवर मोठा खड्डा पडला. त्यात, धामोरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी मुळा धरणातून घेतलेल्या सायफनच्या चार जलवाहिन्या फुटल्या.
शेतकऱ्यांनी जलवाहिन्या दुरुस्तीसाठी जेसीबीने उकरून, खड्ड्यातील पाणी डिझेल पंपाने काढले. त्यावेळी फुटलेल्या जलवाहिन्याच्या खाली खड्ड्यात एक बॉम्ब रुतलेला आढळला. भारतीय लष्कराच्या सेवेतून निवृत्त महसूल खात्यात तलाठी पदावर रुजू झालेले ज्ञानदेव बेल्हेकर यांनी के. के. रेंजचे सुभेदार जतीन म्याना यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी वायुसेना व थलसेनेच्या दोन पथकांनी घटनास्थळी पाहणी केली.
वायुसेनेचा बॉम्ब नाही. बॉम्ब जिवंत आहे. घटनास्थळी फिरकू नये. नाशिकच्या तोफखाना विभागाचे अधिकारी बॉम्ब काढून नेतील, असे सांगून पथक निघून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फुटलेल्या जलवाहिन्या जोडणीचे काम रखडले. त्यामुळे स्वागत प्रमोद सोनवणे, मकरंद निवृत्ती सोनवणे, एकनाथ नामदेव सोनवणे, बाळासाहेब त्र्यंबक सोनवणे (सर्वजण रा. धामोरी खुर्द) या शेतकऱ्यांचे कांदा, ऊस, चारा पिके, तसेच संत्रा, सीताफळाच्या फळबागा उन्हाच्या तडाख्यात पाण्यावाचून जळायला सुरुवात झाली आहे.
मुळा धरणातून धामोरी खुर्दपर्यंत अकरा किलोमीटर सायफन केले. मागील आठवड्यात विमानातून पडलेल्या बॉम्बमुळे जलवाहिन्या फुटल्या. शेवटच्या एका पाण्यावर आलेले पाच एकर कांद्याचे पीक जळायला लागले आहे. मोठे आर्थिक नुकसान आहे. याच सायफनचे पिण्यासाठी वापरत होतो. विहिरीचे क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
- स्वागत सोनवणे, शेतकरी, धामोरी खुर्द
के. के. रेंजचे सुभेदार जतीन म्याना यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी नाशिक तोफखाना विभागाला ईमेल द्वारे कळविले आहे. येत्या एक-दोन दिवसांत खड्ड्यात रुतलेला बॉम्ब काढण्यासाठी पथक येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
- ज्ञानदेव बेल्हेकर, तलाठी, नांदगाव.