पिंपरी, ता. १ : शहरात मेट्रो सुरू झाल्यापासून दररोज हजारो नागरिक प्रवास करत आहेत. पण, घर किंवा कार्यालयापासून मेट्रो स्टेशनला आल्यानंतर खासगी वाहनांच्या पार्किंगचा गोंधळ तीन वर्षांपासून कायम आहे. कोणत्याही स्टेशनवर माहितीफलक नसल्याने वाहन कोठे उभे करायचे, हे समजत नसल्याने ‘टोइंग’ कारवाईला तोंड द्यावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘अर्बन स्ट्रीट’ धोरणांतर्गत पदपथांचे काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत पदपथ, सायकल ट्रॅक आणि दुचाकी पार्किंग अशी रचना करण्यात आली. मात्र, माहिती फलक (साइनेज) उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गोंधळात भर पडत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिक पीएमपी किंवा आपल्या खासगी वाहनांद्वारे मेट्रो स्टेशन गाठून प्रवास करतात. पिंपरी-चिंचवड शहरातील पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी ही सहा स्टेशन्स आहेत. या सर्वच ठिकाणी पदपथावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. ज्या मेट्रो स्थानकाबाहेर ‘अर्बन स्ट्रीट’चे काम पूर्ण झाले आहे, तेथेही माहिती फलक उभारलेले नाहीत. परिणामी, वाहन चालकांचा गोंधळ उडात आहे. मेट्रोची पार्किंग अधिकृत नसल्याने वाहनचोरीच्या घटनांमध्येही वाढत आहेत. महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने यावर त्वरीत तोडगा काढून मेट्रो प्रवाशांचा पार्किंगचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
तीन वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
पिंपरी ते फुगेवाडी ६ मार्च २०२२ पासून मेट्रोची सुरूवात झाली. यानंतर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट १ ऑगस्ट २०२३ रोजी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावर २९ सप्टेंबर २०२४ पासून मेट्रो धावण्यास सुरूवात झाली. अधिकृत पार्किंग न केल्याने वाहने पदपथावर पार्क केली जात आहेत.
‘अर्बन स्ट्रीट’ चे काम सुरू आहे. साइनेज उभारलेले नाहीत. मेट्रो स्थानक परिसराचे काम पूर्ण होत आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अनधिकृत पार्किंग दिसल्यास पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कारवाई होणार आहे.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा.
पदपथावर करण्यात येत असलेली पार्किंग अनधिकृत आहे. ‘अर्बन स्ट्रीट’ अंतर्गत पार्किंगसाठी जागा ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानकाबाहेरील काम पूर्ण होत आले आहे.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता