निवघा बाजार : शिरड येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांना ग्रामस्थांनीच पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी गावकऱ्यांना १५ दिवसात गावातील दारू विक्री पूर्णपणे बंद करू, असे सांगितले आहे.
हदगाव तालुक्यातील शिरड येथे विना परवाना देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दिवसेंदिवस दारू विक्रेत्यांची संख्या वाढतच चालली आहे. दारू विक्रेते घरपोच तळीरामांना देशी व विदेशी दारुचा पुरवठा करीत असल्याने तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लहान लहान मुलेसुद्धा दारूच्या आहारी गेल्याने गावात भांडणे वाढू लागली. गावातील व बाहेर गावातील मुली शिक्षणाकरीता व ट्यूशन करीता जाताना तळीरामांकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत होत्या. तर घराघरात दारू मुळे कोटौंबिक वाद वाढत होते. याबाबत विश्वनाथ फाळेगावकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून गावात दारू विक्री बाबत कारवाईची मागणी केली.
बुधवारी (२६ मार्च) रोजी रात्री दहा वाजता निवघा चौकीचे फौजदार माधव बेंबडे, जमादार ज्ञानेश्वर जुडे, भारत गायकवाड हे गावात आल्यावर गावातील महिला, पुरुष, तरुण असे दोनशे ते तीनशे लोक एकत्र आले व त्यांनी दारू विकेत्यांच्या घरी जाऊन दारुचे बॉक्स पोलिसांना दाखविले. पोलिसांनी ते जप्त केले.
‘गावकऱ्यांनी पोलिसांना दारू बंदीबाबत साथ द्यावी, तुमच्या गावातील दारू विक्री पंधरा दिवसात पूर्णपणे बंद करतो’ असे आश्वासन फौजदार माधव बेंबडे यांनी दिले. माहिती देण्यासाठी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबरही गावकऱ्यांना दिला.