Congress Maharashtra State President Harshavardhan Sapkal on Kunal Kamra controversy
Marathi April 02, 2025 04:24 AM


मुंबई : “काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे. पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्ट दिसते,” असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. (Congress Maharashtra State President Harshavardhan Sapkal on Kunal Kamra controversy)

हेही वाचा : Suresh Dhas : सुरेश धसांनी तृप्ती देसाई अन् अंजली दमानियांना फटकारले, म्हणाले, ‘माहिती नसलेल्या गोष्टीत तोंड घालू नये’ 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ पुढे म्हणाले की, एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्विकार करायला हवा. त्याकडे एक विनोद म्हणूनच पहायला हवे. देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. मनमोहन सिंग तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही अत्यंत जहरी विनोद केले गेले. पण त्यासाठी कलाकार किंवा कोणा प्रेक्षकांना अशा पद्धतीने वेठीस धरले नाही.” असे म्हणत त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने तोडफोड करणे, कामराला धमकी देणे असे प्रकार सुरु आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष?” अस सवाल त्यांनी केला आहे.

“कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडफोड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणाऱ्यांना पोलीसांचा जाच हा कसला न्याय? महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा. राज्यातील सरकारची कार्यपद्धती ही चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी आहे,” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, “भाजप युतीचे सरकार येऊन तीन महिने झाले. या तीन महिन्यात बीड आणि परभणीत हत्या झाल्या. मुंबईत माजी मंत्र्याची हत्या झाली, सेलिब्रिटींना धमक्या येत आहेत, अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. स्वारगेटच्या बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाला, राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही. कोयता गँग, आका, खोक्या अशा गँग उघडपणे नंगानाच करत आहेत पण गृहखाते व पोलीस विभाग ही गुन्हेगारी रोखू शकत नाही.” अशी टीका त्यांनी केली.

“पुण्यासारख्या शहरांपासून धारशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ड्रग्ज खुलेआम विकले जाते त्यावर आळा घालता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही. फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करणे, विरोधकांचे फोन टॅप करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन करु न देणे व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे मंत्री थेट धमक्या देतात पण गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. गृहमंत्री व पोलीस महासंचालक ही दोन्ही पदे शोभेच्या बाहुल्या बनल्या आहेत. फडणविसांना गृहविभागाला वेळ देता येत नाही, त्यांना अतिरिक्त काम झेपत नाही, त्यांनी राज्याचे हित लक्षात घेऊन पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नेमावा व मुदतवाढ दिलेल्या पोलीस महासंचालकांना सन्मानाने निवृत्त करून नविन सक्षम निष्पक्षपाती अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करावी” अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.