IPL 2025, LSG vs PBKS: छोटा डायनामो! आयुष बदोनीने पंजाबला झोडले, सोबतीला पूरन-सामदनेही हात साफ केले
esakal April 02, 2025 05:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १३ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात मंगळवारी (१ एप्रिल) खेळवला जात आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरले.

या सामन्यात लखनौने पंजाबसमोर विजयाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौसाठी आयुष बडोनीने चांगली फलंदाजी केली.

या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले.

एडेन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी सलामीला फलंदाजी केली. पण पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मिचेल मार्शला शून्यावर माघारी धाडले.

पण नंतर मार्करम आणि निकोलस पूरन यांनी डाव सावरला होता. मार्करम आक्रमक खेळत होता. पण चौथ्या षटकात त्याचा अडथळा पंजाबकडून पदार्पण केलेल्या लॉकी फर्ग्युसनने दूर केला.

त्याने मार्करमला त्रिफळाचीत केले. मार्करमने ४ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. पाठोपाठ कर्णधार रिषभ पंतही २ धावांवर बाद झाला. त्याला ग्लेन मॅक्सवेलने युझवेंद्र चहलच्या हातून झेलबाद केले.

पण नंतर ऑरेंज कॅप सध्या ज्याच्याकडे आहे, त्या निकोलस पूरनने आयुष बडोनीला साथीला घेत आक्रमक खेळ सुरू केला. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. ही भागीदारी धोकादायक ठरेल, असं वाटत असतानाच १२ व्या षटकात पूरनला युझवेंद्र चहलने ग्लेन मॅक्सवेलच्या हातून बाद केले.

पूरनने ५ चौकार आणि २ षटकारांसह ३० चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक ६ धावांनी हुकले. नंतर डेव्हिड मिलर बडोनीला साथ देत होता. पण त्यालाही १६ व्या षटकात १९ धावांवर मार्को यान्सिनने बाद केले.

पण अब्दुल सामदने बडोनीला भक्कम साथ दिली. बडोनी अर्धशतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात बडोनी आणि सामद या दोघांनाही अर्शदीप सिंगने बाद केले. पण त्यांच्या आक्रमणामुळे पंजाबने २० षटकात ७ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली.

बडोनीने ३३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार मारत ४१ धावा केल्या, तर सामदने २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावांची खेळी केली.

पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सिन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.