आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण मागच्या काही वर्षात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही हवा तसा रिझल्ट मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडून काढून ती हार्दिक पांड्याच्या हाती सोपवली आहे. रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेतील आतापर्यचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. पण त्याला आता सर्वच जबाबदारीतून मोकळं केलं आहे. सध्या संघात त्याची जागा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दिसत आहे. यानंतर रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं आहे. या स्पर्धेतील तीन सामन्यात मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात होमग्राउंड वानखेडेवर कोलकात्याला पराभूत केलं आहे. पण या सामन्यातही रोहित शर्मा इम्पॅक्ट पाडू शकला नाही.
रोहित शर्माने जिओस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘मी जेव्हापासून सुरु केलं आहे तेव्हापासून बरंच काही बदललं आहे. मी तेव्हा मधल्या फळीत फलंदाजीला यायचो आणि आता ओपनिंग करतो. मी कॅप्टन होतो आणि आता नाही. आमच्या चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या हंगामातील माझे काही सहकारी आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. म्हणून, भूमिका बदलल्या आहेत, बरेच काही बदलले आहे, परंतु मानसिकता तीच आहे. या संघासाठी मी जे करू इच्छितो ते बदललेले नाही आणि ते म्हणजे तिथे जाऊन सामने आणि ट्रॉफी जिंकणे. मुंबई इंडियन्स त्यासाठीच ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत, आम्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि ज्या परिस्थितीत कोणीही विश्वास ठेवत नव्हते अशा परिस्थितीतून सामने वळवले आहेत. मुंबई इंडियन्स त्यासाठी ओळखली जाते.’
“संघात ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी खेळाडू आहेत. ते मुंबई इंडियन्सची संस्कृती समजून घेतात. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आहे,त्याच्याकडेही अनुभव आहे. विल जॅक्स आणि रीस टॉपलीसारखे खेळाडू चांगले खेळाडू आहेत.तर रायन रिकेल्टन हा एक रोमांचक तरुण खेळाडू आहे. या प्रत्येक खेळाडूत काहीतरी वेगळेपणा आहे आणि त्याचा मोठा प्रभाव पडतो. आमच्याकडे अनेक तरुण भारतीय खेळाडू आहेत ज्यांची क्षमता मोठी आहे आणि मी त्यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. माझे ध्येय आयपीएल ट्रॉफी जिंकणे आणि मुंबई इंडियन्सला पुन्हा वैभव मिळवून देणे आहे.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.