आयपीएल 2025 स्पर्धेतील आणखी एक महत्त्वाचा सामना दोन दिग्गज फ्रेंचायझीमध्ये होत आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांची स्पर्धेतील स्थिती जवळपास सारखी आहे. मुंबई इंडियन्सने तीन पैकी 1 सामना जिंकला असून दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्सही तीन पैकी 1 सामना जिंकत सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.309 तर लखनौचा नेट रनरेट हा -0.150 इतका आहे. त्यामुळे गुणतालिकेत झेप घेण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. हा सामना लखनौचं होमग्राउंड इकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघात काही बदल करू शकते.
मुंबई इंडियन्सकडून सलामी रोहित शर्मा आणि रियान रिकल्टन ही जोडी येईल यात काही शंका नाही. पहिली गोलंदाजी आली तर रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयरमध्ये असेल. रिकल्टनने मागच्या सामन्यात 41 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मा 12 चेंडूत 13 धावा करून बाद झाला होता. विल जॅक्स तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. जॅक्स मागच्या सामन्यात फेल गेला होता. त्याने 17 चेंडूत 16 धावांची खेळी केली होती. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव उतरेल. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 9 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. लोअर मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि नमनधीर फलंदाजीला येतील. दरम्यान, मागच्या तीन सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर फलंदाज काही खास करू शकलेले नाहीत.
एकाना स्टेडियममधील खेळपट्टी ही गोलंदाजांना पूरक आहे. मिचेल सँटनर आणि विग्नेश पुथूरच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा अश्वनी कुमार, हार्दिक पांड्या, दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्टच्या खांद्यावर असेल. अश्वनी कुमारने कोलकाता विरूद्धच्या सामन्यात 3 षटकात 24 दावा देत 4 गडी बाद केले होते. तर दीपक चाहरने दोन गडी बाद केले होते.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर), रियान रिकल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विग्नेश पुथुर.