दिलीप कांबळे
Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पुण्यातील मावळ येथे अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरूणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावळ येथील कान्हे आंबेवाडी येथील २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. कोयत्याने त्याच्या मानेवर सपासप वार करत जीव घेण्यात आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून च्या कान्हे आंबेवाडी येथील २२ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.. आरोपीने धारदार कोयत्याने युवकाच्या मानेवर वार करत जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले. मृत तरुणाचे नाव वैभव उमेश सातकर असे आहे. तर खून करणाऱ्या आरोपीचे नाव अंकुश जयवंत सातकर (वय बेचाळीस आंबेवाडी, कान्हे ) असे आहे.
वडगाव पोलीस ठाण्याला माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे पाठवला आहे. मयत वैभव सातकर आणि आरोपी अंकुश सातकर हे दोघे शेजारी राहत होते. मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी अंकुश सातकरने त्याच्यावर बैलाच्या गोठ्यात धारदार कोयत्याने वार केले.
या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.