आपटाळे, ता. २ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात काकडीची प्रतवारी करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ्यात मागणी वाढल्याने सध्या तोडणीची लगबग सुरू आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे व ढगाळ हवामानामुळे कळी गळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे उत्पादनात घट झाल्याचे खामगाव येथील काकडी उत्पादक दिनेश आहेर यांनी सांगितले.
खामगाव येथील दिनेश आहेर या शेतकऱ्याने पाऊण एकर क्षेत्रावर नेत्रा प्रजातीच्या काकडीची लागवड केली. लागवडीसाठी बियाणे, मल्चिंग, बेसल डोस व मजुरी करिता चाळीस हजार रुपये, फवारणी व औषधे यासाठी ३५ हजार रुपये, बाग उभारणीसाठी २४ हजार रुपये व इतर मजुरी असा एक लाखाहून अधिक भांडवली खर्च झाला. दीड महिन्यानंतर काकडीच्या तोडणीसाठी सुरुवात करण्यात आली. आहेर यांनी पाऊण गुंठ्यांत जवळपास दीड टन काकडीचे उत्पादन घेतले. काकडी विक्रीसाठी मुंबई बाजारपेठेत पाठवण्यात येते. तर प्रतिदहा किलो सरासरी १६० रुपये बाजारभाव मिळाल्याचे आहेर यांनी सांगितले.
उन्हाळ्यात काकडीचे उत्पादन घेत असतो. सततच्या हवामानातील बदलामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन घटल्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे.
- दिनेश आहेर, शेतकरी
02485