उल्हासनगर : उल्हासनगर शहरातीळ वेगवेगळ्या परिसरात दुचाकी चोरीच तपास करत असताना मोटरसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगारास विठ्ठलवाडी पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत त्याच्याकडून आठ मोटरसायकली असा एकूण सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात मोटरसायकल चोरांनी धुमाकूळ घातला होता. रोज उल्हासनगर शहरातील कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोटरसायकल चोरीला जात होती. प्रकरणी येत असलेल्या तक्रारींवरून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सायकल चोरांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका मोटरसायकल चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते.
एका सीसीटीव्ही फुटेजवरून तपास
यावरून तपासणी केली असता मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेबर कॉलनी येथे साफळा रचला होता. यावेळी एक संशयित तरुण मोटरसायकलवर जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्या तरुणाकडे असलेली गाडी सुद्धा चोरी करून आणली होती. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने उल्हासनगर, विठ्ठलवाडी, हिल लाईन, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली.
सव्वाचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत
दरम्यान त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आठ मोटरसायकल चोरी केल्याचे मान्य केले. हितेश कटेजा असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो शहरातील खेमानी परिसरात राहणार आहे, या आरोपीकडून पोलिसांनी आठ मोटरसायकली जप्त केल्या असून एकूण सव्वा चार लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता ४ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली.