Ice Cream Industry : आइस्क्रीम उद्योगाचा महाराष्ट्रात झपाट्याने विस्तार; शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी वाढली
esakal April 03, 2025 04:45 PM

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम, बदलते ग्राहक आणि विविध प्रकारांच्या आइस्क्रीमच्या वाढत्या मागणीमुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २५०० ते ३००० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, संपूर्ण देशपातळीवर हा व्यवसाय ३० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचला असल्याचे प्रेसिडेंट स्मॉल स्केल आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, इंडियाचे अनिल पाटोदी यांनी सांगितले.

भारतात आइस्क्रीम आता केवळ उन्हाळ्यापुरते मर्यादित राहिले नसून वर्षभर विकले जात आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, सण आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये आइस्क्रीम देण्याची प्रथा झपाट्याने वाढत आहे. यामुळेच या व्यवसायाला नवे आयाम मिळत आहेत. परंपरागत आइस्क्रीमच्या जोडीला नॅचरल फ्लेवर्स, कुल्फी, आइस्क्रीम केक, संडे आणि विविध प्रकारांमध्येही ग्राहक रस घेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले आइस्क्रीम प्राधान्याने निवडले जात असल्यामुळे स्थानिक उत्पादक आणि ब्रँड्सदेखील या मागणीला प्रतिसाद देत आहेत.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आइस्क्रीमचे उत्पादन होत असले तरी बाहेरील राज्यांमधूनही येथे पुरवठा केला जातो. गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात आइस्क्रीम महाराष्ट्रात येते. यामुळे या उद्योगात राज्यस्तरीय तसेच आंतरराज्यीय स्पर्धा वाढली आहे. देश-विदेशांतील २५ हजारांहून अधिक कारखान्यांमध्ये आधुनिक आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर करून उत्पादन सुरू आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध फ्लेवर्स आणि चवी विकसित केल्या जात आहेत. या उद्योगातील गुंतवणूक वाढत असून, निर्यात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.

शेतकऱ्यांसाठी संधी आणि रोजगार निर्मिती

आइस्क्रीमचा कच्चा माल प्रामुख्याने दुधावर अवलंबून असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक स्थिर जोडधंदा ठरला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात हा व्यवसाय मोलाची भूमिका बजावत आहे. त्याचप्रमाणे, शहरांबरोबरच ग्रामीण आणि तालुका स्तरावरही आइस्क्रीम विक्री वाढल्याने छोट्या उद्योगांना चालना मिळाली. रोजगार निर्मितीलाही हातभार लागला आहे.

जीएसटीमधील सवलतीसाठी मागणी

आइस्क्रीमवर सध्या १८ टक्के जीएसटी आहे, परंतु हा कर कमी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आइस्क्रीम लक्झरी वस्तू नसून सर्वसामान्य नागरिक देखील याचा आनंद घेतात. छत्तीसगड उच्च न्यायालयाने या विषयावर विचार करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे पाटोदी म्हणाले.

यंदा दूध, साखर आणि अन्य कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत असला तरी कोकोच्या उत्पादनात अडचणी आल्याने चॉकलेट फ्लेवरच्या आइस्क्रीमच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. कोकोच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादक अडचणीत आले असले तरीही ग्राहकांवरील भार वाढू नये म्हणून त्यांनी किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- अनिल पाटोदी, प्रेसिडेंट स्मॉल स्केल आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, इंडिया

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.