Jagdeep Dhankhar : जगदीप धनकड यांची महत्वाची टिप्पणी, केंद्रांचे अधिकार न्यायालयांना देता येतील का?
esakal April 03, 2025 05:45 PM

नवी दिल्ली : ‘‘केंद्र सरकार आपले कार्यकारी अधिकार न्यायालयांना हाती सोपवू शकते काय?’’ असा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करीत आज राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप  धनकड यांनी सरकारच  सर्वोच्च असल्याचा निर्वाळा दिला. 

धनकड म्हणाले, ‘‘सरकारांना आपले कार्यकारी अधिकार न्यायालयांना सोपवता येऊ शकतात काय? हा मुद्दा मी सभागृहाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिला आहे. लोकशाहीमध्ये शासन केवळ सरकारच्याच हाती असायला हवे.

कार्यपालिका बांधिल

कारण कार्यपालिका ही संसदेला आणि निवडणुकांमध्ये जनतेला उत्तर देण्यास बांधिल असते. देशातील प्रशासनासाठी जनतेकडून सरकार निवडले जाते. त्यामुळे सरकार व्यतिरिक्त अन्य संस्था कार्यकारी शासन कसे करू शकते? अन्य कुठल्याही संस्थेकडून काही महत्त्वाचे आले तरी हे क्षेत्र खास कार्यपालिकेचेच आहे.

कारण देशाचा कारभार चालवण्यासाठी कार्यपालिकेला जनता निवडून देत असते. या देशात कार्यकारी शासन सरकारशिवाय चालू शकत नाही. सरकार सर्वोच्च आहे.’’ आज राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासावेळी धनकड यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.