IPL 2025, Point Table : कोलकात्याने हैदराबादला केलं पराभूत, पण मुंबई इंडियन्सला बसला फटका
GH News April 04, 2025 02:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 15वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. दोन्ही संघातील हा चौथा सामना होता. नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. केकेआरचा वेंकटेश अय्यर हैदराबादच्या गोलंदाजीवर भारी पडला. कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 200 धावा केल्या आणि विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेला नितीश कुमार रेड्डीही काही खास करू शकला नाही. त्यामुळे कोलकात्यावरील दडपण वाढत गेलं. या संकटातून बाहेर काढणं काही मधल्या फळीतील फलंदाजांना जमलं नाही आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. हैदराबादचा संपूर्ण संघ 120 धावा करू शकला आणि 80 धावांनी पराभव सहन करावा लागला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला आणि गुणतालिकेत उलथापालथ केली आहे.

सनरायझर्स हैदराबाद सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सर्वात शेवटी होता. मुंबई इंडियन्सने मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेटचं नुकसान झालं होतं. कोलकाता नाईट रायडर्स संघ 2 गुण आणि -1.428 नेट रनरेटसह शेवटच्या स्थानी होता. पण या सामन्यातील विजयानंतर गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे 4 गुण झाले असून नेट रनरेटही सुधारला आहे. पण गुजरात टायटन्सपेक्षा कमी असल्याने पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. तर मुंबई इंडियन्सला मात्र फटका बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सचे दोन गुण आहेत. त्यामुळे खाली जाणार हे निश्चित होतं.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला फटका बसला आहे. या पराभवामुळे थेट शेवटच्या स्थानावर घसरण झाली. या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ एक विजय मिळवत 2 गुण आणि -0.871 नेट रनरेटसह आठव्या स्थानी होता. पण आता नेट रनरेट घसरल्याने राजस्थान रॉयल्सपेक्षा स्थिती वाईट झाली आहे. दरम्यान, पंजाबचा संघ 4 गुण आणि +1.485 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि +1.320 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे.

आरसीबीचे 4 गुण असून नेट रनरेट +1.149 सह तिसर्‍या स्थानी आहे. गुजरात टायटन्सने 4 गुण आणि +0.807 नेट रनरेटसह चौथ्या, कोलकाता नाईट रायडर्स 4 गुण आणि +0.070 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स 2 गुण +0.309 नेट रनरेटसह सहाव्या, लखनौ सुपर जायंट्स 2 गुण आणि -0.150 नेट रनरेटसह सातव्या, चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि -0.771 नेट रनरेटसह आठव्या, , राजस्थान रॉयल्स 2 गुण आणि -1.112 नेट रनरेटसह नवव्या आणि सनरायझर्स हैदराबाद दहाव्या स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबादचे 2 गुण आणि -1.612 नेट रनरेट आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.