पुणे : ‘गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना, काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होते. त्यांचा प्रस्ताव ‘एसीबी’कडे पाठविण्याची वेळ येते. सर्व मर्यादा पार केल्यावर हे करावे लागते,’’ असे सांगतानाच ‘‘एका तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्यापासून सचिवांपर्यंतचे सर्वांचे अधिकार वापरले. २२ लक्षवेधी तहसीलदारावर होतात हे चांगले नाही. तसेच, निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकताच अहवाल जाहीर केला. त्यामध्ये भ्रष्टाचारात महसूल खाते अव्वल आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार मीना, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, नाशिक विभागीय आयुक्त, प्रवीण गेडाम, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, ‘‘महसूल विभाग महाराष्ट्राचा आणि सरकारचा चेहरा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला साकार करायचा आहे. तो साकारताना तलाठ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत पारदर्शी काम करा. कामे करताना अनवधानाने चुका होतात. ५० चुका झाल्या; तरी चालतील, मी त्या माफ करेन. मात्र, जाणीवपूर्वक एकही चूक करू नका. काही अधिकारी सर्व मर्यादा पार करतात. यामुळे मला आणि सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतात. तलाठ्यापासून विभागीय आयुक्तांपर्यंत प्रत्येकाने नावीन्यपूर्ण योजना आखा. एकतरी नावीन्यपूर्ण कार्य करा. उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच अधिकाऱ्यांचा सरकार विधानसभेत कौतुक करणार आहे.’’
‘तलाठ्याची कामे मंत्र्यांकडे नको’मला काही दौऱ्यांमध्ये महसुलाच्या कामासंबंधी ८०० ते ९०० निवेदने मिळाली. तलाठ्यांच्या पातळ्यांवरील छोटी कामे होत नाहीत, याचे वाईट वाटते. यापुढे एकही निवेदन मिळायला नको, अशी कामे सर्वांनी करा. माझ्याकडे येणाऱ्या अर्जांची टक्केवारी कमी करा. मी फोन केला, की कामे होतात. मग तलाठ्यांकडील कामे का होत नाहीत? मुख्यमंत्र्यांकडे महसूलकडे एकही अर्ज येता कामा नये. सुनावणीची तारीखच मिळाली नाही, म्हणून शेतकऱ्याने मंत्रालयात उडी मारली हे चांगले नाही. शून्य सुनावणी संकल्प करा आणि त्याची पूर्ती करा, असेही बावनकुळे म्हणाले.
‘माध्यमांना सामोरे जा’माध्यमांना सामोरे जा, नकारात्मक बातम्यांची दखल घेऊन खंडण करा. बातमीचे वास्तव मांडा. खरे असेल; तर चुकांमध्ये सुधारणा करा. माध्यमांद्वारे समाजात आपली प्रतिमा चांगली करा. माध्यमांचा सकारात्मक वापर करा. माध्यमे तुम्हाला राजकीय प्रश्न विचारत नाहीत; ते प्रशासकीय प्रश्न विचारतात, त्यांना सविस्तर माहिती देऊन आपल्या विभागाची प्रतिमा उजळ करा, असेही बावनकुळे म्हणाले.