‘है प्रीत यहां की रीत सदा..’ ही गायक महेंद्र कपूरच्या बुलंद आवाजातली लकेर सिनेमागृहात घुमली की खुर्ची-खुर्चीतला प्रेक्षक उठून उभा राहायचा. पुढ्यातल्या भव्य रुपेरी पडद्यावरचा पाठमोरा नायक ‘भारत की बात’ सुनावू लागला की अंगात देशप्रेमाच्या लहरी उसळत. बघावे तेव्हा कोनात वळलेला चेहरा, हनुवटी किंवा गालावर बोट, जणू आपला देखणा चेहरा त्याला दाखवायची इच्छाच नाही. डोळ्यात काहीसे दुखरे भाव आणि त्या भावातही फारसा बदल संभवतच नाही. तरीही या अभिनेत्याचे नाव अग्रणी सिताऱ्यांमध्ये कायम समाविष्ट असे. देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, राजकुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना अशा तगड्या सिताऱ्यांच्या भाऊगर्दीत हरिकृष्ण गिरी गोस्वामी ऊर्फ मनोजकुमार हा तारा आपले आपले नक्षत्रांचे देणे घेऊन अढळपणे उभा राहिला. ‘ऐसी जगह बैठिये, कोई न बोले उठ, ऐसी बोली बोलिए, कोई न बोले झूठ’ हा संत कबिराचा सांगावा त्याने बहुधा आंगोपांगी बाणवला असावा. इतर सिताऱ्यांसारखा तो तळपणारा कधीच नव्हता. बेजोड अभिनयाचे वरदानही त्याला कदाचित लाभले नव्हते.
पण त्याच्या त्या देहयष्टीत एक अंतर्बाह्य भारतीय मन होते, जिथे केवळ आणि केवळ मातृभूमीची स्तवनेच गुंजत होती. हरिकृष्ण गोस्वामीचा चंदेरी दुनियेत प्रवेश होताच त्याचा ‘मनोजकुमार’ झाला. त्या मनोजकुमारला रसिक चित्रपटप्रेमींनी लाडाने ‘भारतकुमार’ असे टोपणनाव बहाल केले. तीन नावांची ही कहाणी शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास संपली. रुपेरी पडद्यावर मुहब्बतीची पेठ केव्हाच उघडली गेली होती, त्याच पेठेत देशभक्तीचा ठेला टाकणाऱ्या मनोजकुमार यांनी इहलोकीची यात्रा संपवली, एक ग्लॅमरस देशभक्तीचे पर्व संपले. केवळ झाडाझुडपांपाठीमागे पळण्यात आणि हसीन वादियों में गीतगुंजन करण्यातच रोमान्स नाही, तर देशावर जान कुर्बान करण्यातही यापेक्षा अधिक रोमँटिसिझम आहे, हे मनोजकुमार यांनी अचूक ओळखले होते. अभिनेता म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द खमकेपणाने सांभाळली.
उंचपुरी देहयष्टी आणि जन्मजात लाभलेले देखणेपण यांच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटांना अपेक्षित असलेल्या नायकाच्या भूमिकाही यथास्थित निभावल्या. पण चित्रपट निर्माता म्हणून जोखीम उचलताना त्यांनी बव्हंशी देशभक्तीचाच आधार घेतला. किंबहुना देशभक्तीपर चित्रपटांनाही भरपूर गल्ला जमतो, हे त्यांनी सिद्ध केले.
शहीद भगतसिंगांच्या हौतात्म्याचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्याखातर त्यांनी ‘शहीद’ हा चित्रपटही केला. देश स्वतंत्र होऊन पहिली पावले टाकत होता. या उभारणीच्या काळात पं. नेहरु हेच भारतीय समाजाचे नायक होते. पं. नेहरुंची गालावर बोट ठेवलेली ती प्रतिमाच कळन नकळत मनोजकुमार यांनी उचलली असावी. राजकीय नेत्यांशीही त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. किसानांच्या परवडीविषयी काही चित्रपटात दाखवा, अशी इच्छा तेव्हा लालबहादुर शास्त्रीजींनी व्यक्त केल्यावर मनोजकुमार यांनी ‘जय जवान जय किसान’ या नाऱ्यावर बेतलेला ‘उपकार’ हा चित्रपट सजवून धजवून पडद्यावर आणला. इथूनच त्यांची ओळख भारत कुमार अशी झाली.
एकीकडे ‘वो कौन थी’, ‘गुमनाम’, ‘हिमालय की गोद में’, ‘पत्थर के सनम’, ‘दो बदन’, ‘हरियाली और रास्ता’, ‘सावन की घटा’, `नीलकमल’ असे चित्रपट लागोपाठ देणाऱ्या मनोजकुमार यांना वतन की मिट्टी त्याच काळात बोलावू लागली होती. शहीद, उपकार, रोटी कपडा और मकान, क्रांती यांसारखे चित्रपटही त्यांनी रसिकांसमोर सातत्याने पेश केले. ‘‘हरिकृष्ण गोस्वामीचे नाव बदलून मीच मनोजकुमार असे केले; पण मनोजकुमारचा भारत कुमार या देशातल्या लोकांनी केला’’, हे ते अभिमानाने सांगत असत.
देशभक्ती आणि बॉक्स ऑफिसचे गणित जुळणारे आहे, हा नवा शोध मनोजकुमार यांनी लावून दिल्याने त्यांच्यानंतर अनेकांनी हा ढाचा जमेल तसा वापरला. त्यातले काही चित्रपट यशस्वीही ठरले. तथापि, मनोजकुमार यांच्या मनातली देशभक्तीची जाणीव ही फाळणी, देश आणि समाजाची पुनःउभारणी यावर पोसलेली होती. त्याग, हौतात्म्य, भाबडेपणा, आदर्शवाद हे शब्द त्या काळात खूप खूप मोलाचे होते.
मनोजकुमार ज्यावेळी चित्रपट करीत होते, तो राष्ट्रउभारणीच्या प्रारंभीचा काळ होता. स्वातंत्र्यलढ्याच्या ध्येयवादाचे उत्कट रंग अजूनही वातावरणावर प्रभाव टिकवून होते. अशाकाळात त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे महत्त्व ओळखणे ही गोष्ट उल्लेखनीय होती. आजच्या काळात नव्या पिढ्यांपुढे नवी आव्हाने समोर आलेली आहेत. राष्ट्रभावनेला आजही महत्त्व आहेच; पण गरज आहे ती तिला ‘शास्त्रकाट्याची कसोटी’ लावण्याची.
तशी ती लावणाऱ्या आजच्या कलाकारालाही मनोजकुमार यांनी या वाटेवर उमटविलेल्या प्रारंभीच्या पदचिन्हांचा मागोवा घ्यावा लागेल, यात शंका नाही. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या कर्तृत्वावर मोहोर उमटवली.मनोजकुमार हे कदाचित शतकातला महानायक किंवा नटसम्राट नसतीलही; पण तरीही त्यांनी मनोरंजनाच्या शेल्यात लपेटलेले देशभक्तीचे देणे अशा काही अदाकारीने दिले की, त्यांनी शांतीत केलेली ही क्रांती चिरकाल स्मरणात राहावी.