राहाता / पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील दिघे वस्तीवरल भोसले कुटुंबावर शनिवारी पहाटे दोघांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला. हल्ल्यात वडील व मुलाची हत्या झाली, तर आई गंभीर जखमी झाली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपींना १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
साहेबराव पोपट भोसले (वय ६०), मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३५) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत, तर साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. याबाबत शिवनाथ मारुती दिघे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला भोसले कुटुंब राहते.
भोसले कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील संवत्सरचे आहे. ते आजोळी काकडी शिवारात रहायला आले आहेत. भोसले कुटुंबात साहेबराव भोसले, त्यांच्या पत्नी साखरबाई भोसले, मुलगा कृष्णा भोसले आणि ८० वर्षांच्या आई असे चौघे जण राहतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भोसले कुटुंबातील व्यक्ती दूध घालायला आली नाही. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. घराच्या बाहेर पडवीत झोपलेला कृष्णा भोसले हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. साखरबाई भोसले याही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्या. साहेबराव हेही जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. जखमी साखरबाई व साहेबराव यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचार चालू असताना साहेबराव यांचा मृत्यू झाला. साखरबाई यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव आदींनी ही कारवाई केली.
चोरीच्या उद्देशाने हत्याहल्लेखोरांनी एक दुचाकी, मोबाईल, सोन्याची पोत आणि काही रोख रक्कम पळवली. मात्र, चोरलेला मोबाईल त्यांच्या मुळावर आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासांतच या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संदीप रामदास दहाबाड (वय १८) व जगन काशिनाथ किरकिरे (वय २५, दोघे रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी काहीकाळ काकडी येथे रोजगारासाठी वास्तव्यास होते. त्यांनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
ऐकू येत नसल्याने आजीचा जीव वाचला
८० वर्षांच्या गाईजाबाई घरात होत्या, त्यांच्यावर हल्ला झाला नसल्याने त्या बचावल्या. त्यांना ऐकू येत नाही आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत.