बारामती : आर्थिक संकटात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा निर्णय घेण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे.
परंपरागत विरोधक असलेल्या साखर संघाचे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा देत त्यांच्याकडेच पुढील पाच वर्षांसाठी छत्रपती कारखान्याची जबाबदारी सोपविण्याची तयारी अजित पवार यांनी केल्याची माहिती आहे.
शनिवारी (ता. 5) रात्री उशिरा अजित पवार व पृथ्वीराज जाधव यांच्यामध्ये पवार यांच्या सहयोग निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यावर भर दिल्याचे समजते. गट, तट व राजकीय चढाओढीमध्ये कारखान्याच्या सभासदांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने निवडणुकीचा खर्च व निर्माण होणारी कटूता टाळून कारखान्याच्या भल्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्रित येत वाटचाल करावी असा विचार अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्याकडे बोलून दाखवला.
त्याला जाचक यांनीही मान्यता दिल्याची माहिती आहे. दरम्यान रविवारी (ता. 6) पृथ्वीराज जाचक यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये स्वतः अजित पवार सहभागी होणार असून या मेळाव्यात अजित पवार हे पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा देत त्यांच्यावरच आगामी काळात छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवतील अशी चिन्हे आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती कारखान्याची आर्थिक परिस्थिती संकटाची असल्यामुळे अजित पवार यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. माळेगाव, सोमेश्वर या दोन्ही साखर कारखान्यांच्या मजबूत आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती बाबत नेहमीच अजित पवार नाराज होते.
या निमित्ताने स्वतः अजित पवार यांच्यावर देखील अनेक आरोप झाले, मात्र आता या निवडणुकीच्या निमित्ताने बेरजेचे राजकारण करीत या सर्व प्रक्रियेला गती देत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने अजित पवार यांचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जात आहे.
पृथ्वीराज जाचक व अजित पवार एकत्र आल्यास छत्रपती कारखान्याची निवडणूक जवळपास बिनविरोध होईल अशीच शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान रविवारी दुपारी दीड वाजता होणाऱ्या मेळाव्यात अजित पवार काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. छत्रपतीची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या पाठोपाठ होणा-या माळेगाव साखर कारखान्याचीही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
मिलिंद संगई, बारामती.