बँकेमध्ये मराठी भाषेचा वापर करा
esakal April 07, 2025 01:45 AM

नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, मराठीचा वापर प्रत्येक व्यवहार, बँकांची कागदपत्रे, अर्ज, खाते पुस्तक, सूचना फलक, जाहिराती, धनादेश, बँकेचा मोबाइल संदेश यामध्ये करणे अपेक्षित आहे. याचे पालन व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने जुईनगरमधील विविध सरकारी, खासगी बँकांना पत्र दिले.
जुईनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या चार बँकांमध्ये जाऊन मनसेने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसल्याचे दिसून आले. आरबीआयच्या परिपत्रकाला त्यांनी केराची टोपली दाखवण्याचे काम केल्याचे दिसून आले. बँकांच्या सर्व व्यवहारांत, कागदपत्रांमध्ये, सूचना फलक, जाहिरातीमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या सात दिवसांत अपेक्षित बदल दिसला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आजपासून नवी मुंबईत मनसेचे पदाधिकारी विविध भागांत जाऊन अशा प्रकारचे पत्र बँकांना देणार आहेत. मनसेच्या शिष्टमंडळात महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिता नायडू, दीपाली ढवूळ, मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.