महाड, ता. ६ (बातमीदार) : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पारमाची गावाला तब्बल ३० वर्षांनंतर न्याय मिळाला असून, गावाच्या पुनर्वसनासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पारमाची गावात १९९४ मध्ये दरड कोसळून १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
महाड-पुणे मार्गावर वरंध घाट परिसरामध्ये पारमाची हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. २८ जून १९९४ मध्ये महाड शहर व परिसरात महापूर आला होता. त्याचवेळी सायंकाळी डोंगरामधून मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पारमाची गावातील अनेक घरे दरडीखाली गाडली गेली. यात १३ जणांचा मृत्यू झाला होता.
रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या प्रकाराला या घटनेपासूनच सुरुवात झाली. यानंतर जिल्ह्यात अनेक नैसर्गिक आपत्ती झाल्या. २०२३ मध्ये या गावांमध्ये पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. योग्य वेळी पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांना धोकादायक असलेल्या गावांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. भूगर्भ शास्त्र विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या धोकादायक गावांच्या यादीमध्ये पारमाची गावचे नाव दरवर्षी समाविष्ट असते.
३० वर्षे पुनर्वसन रखडले
१९९४ मध्ये दरड कोसळल्यानंतर गावाच्या पुनर्वसनासाठी दीड किलोमीटर अंतरावर असलेली जागा संपादित करण्यात आली होती. या ठिकाणी प्लॉटही पाडण्यात आले होते, परंतु पुनर्वसित ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा नसल्याने नागरिकांचे पुनर्वसन रखडले होते. २००५ मध्ये ही महाड तालुक्यात चार गावांमध्ये दरड कोसळली होती. येथील बहुसंख्य गावांचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले, परंतु पारमाची गावातील ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी तब्बल ३० वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पारमाचे गाव आणि बौद्धवाडी अशी मिळून सुमारे १२७ घरे या ठिकाणी आहेत.
१९ कोटींचा निधी मंजूर
आमदार भरत गोगावले यांनी पुनर्वसनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, परंतु ते आता रोजगार हमी योजना मंत्री झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. गोगावले यांनी गावाच्या पुनर्वसनासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यांच्या हस्ते पारमाची गाव आणि बौद्धवाडी यांच्या पुनर्वसनाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता. ५) पार पडला. या वेळी हभप फणसे बाबा, माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा गोगावले व मनोज काळीजकर, सीईटीपीचे अध्यक्ष अशोक तलाठी, महाड तालुका शिवसेनाप्रमुख रवींद्र तरडे, माजी सभापती सपना मालुसरे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक विजय सावंत व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
पुनर्वसनासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सरकारने १९ कोटींचा निधी मंजूर केला असून, यातील १५ कोटी सोयीसुविधांसाठी मंजूर आहेत. उर्वरित अडीच कोटी घरे बांधण्यासाठी दिली आहेत. यामध्ये घरे बांधणे शक्य नाही याकरिता आपण सीएसआरमार्फत या ठिकाणच्या नागरिकांना लवकरच लवकर अधिक सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- भरत गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री
महाड ः पारमाची गावच्या पुनर्वसनाचा शुभारंभ मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.