कासा, ता. ६ (बातमीदार) : कासा बाजारपेठेतील हार्डवेअर व्यावसायिकाने आर्थिक अडचणीतून राजस्थानमधील उदयपूर येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेले दिनेश राजपुरोहित (वय ३०) हे गेल्या काही वर्षांपासून कासा येथील बाजारात हार्डवेअर दुकान चालवत होते. काही महिन्यांपासून ते आर्थिक तणावात होते. सततच्या नुकसानीमुळे आणि वाढत्या कर्जामुळे त्यांनी अचानक दुकान बंद केले आणि उदयपूरला निघून गेले. फतेहसागर तलावाजवळ फिरण्यासाठी गेले असता, त्यांनी एकट्याने बोटीत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी सुरक्षाकवच (लाइफ जॅकेट) घातले होते, परंतु काही वेळातच ते काढून त्यांनी पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. बोटीत सापडलेला त्यांचा मोबाईल आणि अन्य वस्तूंमुळे ओळख पटली.
शोधमोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. उदयपूर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना संपर्क करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.
पोलिस तपासात उघड झाले, की दिनेश गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन बेटिंगच्या आहारी गेले होते. जुगारात मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेतले, मात्र कर्जफेड न झाल्याने ते मानसिक तणावात गेले होते.