Sushma Andhare News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आमदाराच्या पीएच्या गर्भवतीला पत्नीला 10 लाख डिपॉझिट भरले नसल्याने उपचार नाकरण्यात आल्याचा आरोप होतो आहे. पीएच्या गर्भवती पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयावर टीका होत आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भावूक झाल्या. त्यांनी फेसबूकवर कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. पोस्ट करत जर आमदाराच्या पीएबाबत असे घडते असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय होत असेल? असा प्रश्न करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
आपल्या पत्राची सुरुवात प्रिय कार्यकर्ता दादा, ताई अशी करत म्हणाल्या की, 'सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही. आपली बायका मुलं रस्त्यावर येतील का.. त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का ? आरोग्य , शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का ? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढार्यांच्या मागे उर फुटेस्तोर धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का?'
सुषमा अंधारेंनी आपली पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'खरच एखाद्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्यातरी योजनेमध्ये बसवता येते का? किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का? यासाठी धडपडत राहिले असते की रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल पण आत्ता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता?',
'मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी 24 तास 7 दिवस घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या जबाबदारीचा मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर.', असा संतापही अंधारे यांनी व्यक्त केला आहे.
अजून आठ पंधरा दिवसात रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल विरून जाईल. असंवेदनशीलता, हलगर्जीपणा दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील. प्रसुतीसाठी 10 ते 20 लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वीयसहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी ? असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्त्वाचा...'सोलापूरचे निर्मला यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायच्या. मात्र आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे? ज्या पक्षासाठी दिवस रात्र जीव झिजवला ती लोक मदतीला पुढे का आली नाही? संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येशी संबंधित सगळे पुरावे ग्रह खात्याच्या हाताशी असताना सुद्धा गृह खात्याने ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी तीन महिने दडवून ठेवले आणि मराठा ओबीसी तणाव वाढवला. कार्यकर्त्याच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्त्वाचा वाटला.', अशी टीका सुषमा अंधारेंनी भाजपवर केली आहे.