इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने गुजरातसमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात गुजरातसाठी पुन्हा एकदा मोहम्मद सिराज चमकला आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सलामीला फलंदाजी केली.
पण, पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा मोठा अडथळा मोहम्मद सिराजने दूर केला. त्याने हेडला साई सुदर्शनच्या हातून ८ धावांवर झेलबाद केले.
त्यानंतर अभिषेकला इशान किशन साथ देत होता. पण ५ व्या षटकात अभिषेक शर्मालाही सिराजनेच राहुल तेवतियाच्या हातून १८ धावांवर बाद केले. इशान किशनही फार काही करू शकला नाही, त्याला १७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने इशांत शर्माच्या हातून झेलबाद केले. तरी त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला.
त्यांना मोठ्या धावा मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी घेऊ दिल्या नव्हत्या. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी धीम्या गतीने होत होती. नितीश आणि क्लासेन यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. पण त्यानंतर लगेचच क्लासेनला २७ धावांवर साई किशोरने १४ व्या षटकात क्लिन बोल्ड केले. नितीशलाही १६ व्या षटकात ३१ धावांवर साई किशोरनेच बाद केले.
त्याचा झेल रशीद खानने घेतला. कामिंडू मेंडिसलाही १ धावेवरच प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. अनिकेत वर्माचा मोठा अडथळाही सिराजनेच १९ व्या षटकात पायचीत पकडले. अनिकेत १८ धावांवर बाद झाला. याच षटकात त्याने इम्पॅक्ट सब्स्टिट्युट म्हणून मैदानात आलेल्या सीमरजीत सिंगलाही त्रिफळाचीत करत हैदराबादला आठवा धक्का दिला.
तरी शेवटी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या काही आक्रमक शॉट्समुळे संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. हैदराबादने २० षटकात ८ बाद १५२ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स ९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २२ धावांवर नाबाद राहिला. मोहम्मद शमी ६ धावांवर नाबाद राहिली.
गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात या ४ विकेट्स घेताना १७ धावाच खर्च केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.