Latest Maharashtra News Updates : आमदार निवासमध्ये कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू
esakal April 08, 2025 01:45 PM
Mumbai Live : आमदार निवासमध्ये कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये विजय देशमुख यांचे कार्यकर्ते विशाल धोत्रे यांच्या वडिलांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.

Vashim Live : वाशिममध्ये गॅसचा स्फोट, चिमुकल्याचा मृत्यू

वाशिमच्या राजुरामध्ये रात्री गॅसचा स्फोट झाल्याने आजीसह नातू गंभीर जखमी झाला यात नातवाचा मृत्यू झाला असून आजीची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune Live : क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार

क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणात उतरला असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Delhi Fire Service : दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात कारमध्ये आढळला जळालेला मृतदेह

दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील बिजवासन रोड फ्लायओव्हरवर काल रात्री १०.३२ वाजता एका कारला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवलीये. जळालेल्या कारची तपासणी केली असता, कारमधून एक जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Shashank Bavachkar LIVE : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस निरीक्षकपदी नियुक्ती

इचलकरंजी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी बावचकर यांना पाठविले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पक्ष कामाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार बावचकर यांची नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये संघटना बळकटीसाठी नेमके काय करणे आवश्यक आहे, याबाबतचा अहवाल पंधरा दिवसांत देण्याची सूचना बावचकर यांना केली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी आज आरक्षण सोडत, १०२९ ग्रामपंचायतींचा समावेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आज तालुकानिहाय आरक्षण सोडत होणार आहे. यामध्ये १०२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची आणि ज्यांची होणार आहे अशा सर्व ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण प्रक्रिया लागू आहे. तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत होईल.

Kagal Police LIVE : व्हन्नूर येथील मारामारीप्रकरणी ४६ जणांविरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कागल : जुन्या भांडणाचा राग मनात धरून व्हन्नूर (ता. कागल) येथे दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी कागल पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हन्नूर (ता. कागल) येथे शुक्रवारी (ता. ४) जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटांत वाद झाला होता. या वादात काठी व कोयत्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संदीप लोंढे याने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी कागल पोलिसांनी २९ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

12th Exam Result LIVE : कर्नाटकात बारावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

बंगळूर : शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने घेतलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल आज (ता. ८) जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अधिकृत पोर्टल karresults.nic.in आणि kseab.karnataka.gov.in या वेबसाइट्सवर विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. केएसईएबी कर्नाटक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २०२५ अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. विद्यार्थी आणि पालक केएसईएबीच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल आणि गुणपत्रिका तपासू शकतात.

Gold Rate LIVE : सोन्याच्या भावात १,५५० रुपयांची घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले आयातशुल्क आणि त्याविरुद्ध चीनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व्यापारयुद्धाची भीती निर्माण झाल्याने आज सोन्याचा भावात मोठी घसरण झाली. नवी दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १,५५० रुपयांनी घसरून ९१,४५० रुपयांवर आला, तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ९१,००० रुपये झाला, अशी माहिती ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिली आहे.

Shubham Shelke LIVE : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळकेंच्या हद्दपार नोटिसीवर 21 ला सुनावणी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना पाठविण्यात आलेल्या हद्दपार नोटिसीला सोमवारी विशेष दंडाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून समितीच्या वकिलांनी आक्षेप नोंदविला असून, याबाबतची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. शुभम शेळके यांच्यावर शहर आणि परिसरात आठ गुन्हे दाखल आहेत.

Prashant Koratkar LIVE : प्रशांत कोरटकरचा मुक्काम तूर्त कळंबा कारागृहातच; जामीन अर्जावर उद्या निकाल

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम तूर्त वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर बुधवारी (ता. ९) याबाबतचा निकाल दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

Stock Market LIVE : शेअर बाजाराची धूळधाण, तीन टक्क्यांपर्यंत निर्देशांक कोसळले; आशियायी, युरोपीय बाजारांत घसरण

Latest Marathi Live Updates 8 April 2025 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्काबाबत राबविलेल्या जशास तसे धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू लागले असून भारतासह युरोप आणि आशियायी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आज तालुकानिहाय आरक्षण सोडत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम तूर्त वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर काल कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर बुधवारी (ता. ९) याबाबतचा निकाल दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने घेतलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल आज (ता. ८) जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना पाठविण्यात आलेल्या हद्दपार नोटिसीला सोमवारी विशेष दंडाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून समितीच्या वकिलांनी आक्षेप नोंदविला असून, याबाबतची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.