– प्रेमानंद बच्छाव
Shivaji Maharaj : मुंबई : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. परंतु, औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना आग्र्याहून मोठ्या युक्तीने महाराज पेटाऱ्यातून निसटले ती जागा शोधण्यासाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक आणि पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक लवकरच आग्रा येथे जाणार आहेत. त्या जागेची निश्चित करून ती जागा उत्तर प्रदेश सरकारकडून ताब्यात घेणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी येथे दिली. (search for a place for a Shiv Smarak in Agra, informed tourism minister Shambhuraj Desai)
राज्य सरकारच्या वतीने पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक आणि आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने देसाई यांच्यावर या स्मारकांची तर उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारशी समन्वय ठेवण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी सोपवली आहे. या स्मारकासंदर्भात दोन्ही मंत्र्यांची आज मंत्रालयात बैठक पार पडली. त्यानंतर देसाई यांनी स्मारकासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा – Mumbai Highway : मुंबईतील महामार्गांवरील प्रवास होणार अधिक सुखकर, मनपा स्वच्छता मोहिमांचा परिणाम
हरयाणा राज्यातील कालाआंब परिसरात मराठा शौर्यासाठी जागा निश्चित झाली आहे. पण तेथील जागेसंदर्भातील सद्यस्थिती काय आहे तसेच आग्रा येथे महाराज जेथून निसटले ती जागा नेमकी कोणती हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुरातत्व विभागाचे संचालक यांना पाठविण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या पर्यटन आणि पुरातत्व विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही अधिकारी एका महिन्याच्या आत दोन्ही ठिकाणी जाऊन जागेची पाहणी करून स्थळ निश्चिती करतील. त्याबाबतचा अहवाल आम्हाला देतील, असे देसाई आणि रावल यांनी सांगितले.
आग्रा येथील जागा सरकारी असेल तर ती जागा संपादीत करून महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यासंदर्भात अधिकारी पाठपुरावा करणार असून सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर एक महिन्याच्या आत दोन्ही ठिकाणी वास्तू विशारद नेमून वेगवेगळे डिझाईन तयार करून ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासमोर सादर करण्यात येतील. तसेच दोन्ही स्मारकासाठी लागणारी आर्थिक तरतूद जुलै महिन्याच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये केली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Maharashtra Weather : महाराष्ट्र तापला, अनेक जिल्ह्यातील तपमान 40 अंशांवर
Edited by : Ashwini A. Bhatavdekar