-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : इंग्रजीत एक्सक्यूज मी म्हटल्याने तिघांनी तरुणींना मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल होत आहे.
डोंबिवली पश्चिमेला जुनी डोंबिवली परिसरात गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार तक्रारदार गीता चौहान (वय 38) या गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहतात. याच बिल्डिंगमध्ये राहणारे अनिल पवार (वय 40), बाबासाहेब ढबाले (वय 41) आणि रितेश ढबाले (वय 22) यांनी त्यांना मारहाण केली आहे.
सोमवारी रात्री गीता या त्यांच्या मैत्रिणीसोबत जात असताना त्यांनी रस्त्यात उभे असलेल्या तिघांना एक्सक्यूज मी बोलल्या. याचा राग येऊन त्यांनी त्यांना इंग्रजीत बोलायचे नाही मराठीत बोला असे म्हणत मारहाण केली. गीता यांची बहीण त्यावेळी तेथे आली असता तिलाही मारहाण केली. गीता यांनी याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.