कणकवलीत ‘दर्पण’तर्फे आज
‘जय भीम महोत्सव २०२५’
कणकवली, ता.८ : दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे उद्या (ता.९) शहरातील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखालील जागेत जय भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य दिग्दर्शक राजदत्त तांबे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे असून स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे हे आहेत. या महोत्सवांतर्गत व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी सहाला स्थानिक कलावंतांचा ‘भीम जल्लोष २०२५’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बुद्ध, भीमगीते, नृत्य, अभियनाचे आविष्कार पहायला मिळणार आहेत. सायंकाळी सात वाजता जय भीम महोत्सवाचे उद्घाटन राजदत्त तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी निवृत्ती जिल्हाधिकारी सुरेश कदम, प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर, नितीन कदम, प्रा.डॉ.सोमनाथ कदम, संदीप कदम, डॉ. अशोक कदम, सुधीर तांबे, नीलम पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
उद्घाटनीय कार्यक्रमानंतर लेखक, विचारवंत जगदिश ओहोळ यांचे ‘जग बदलणारा बाप माणूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान होईल. रात्री ९ वाजता दर्पण सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यात अभिनेत्री निहारिका राजदत्त, दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. रात्री १० वाजता ए.आर. प्रॉडक्शन आनंद ताबे प्रस्तुत ‘माझी गाणी भीमाची वाणी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात अभियनाचा बादशहा भूषण कडू याचा सहभाग असेल.