Chandrakant Patil : महापालिकेतील गैरकाराभाविरोधात पालकमंत्र्यासोबत घेणार बैठक
esakal April 18, 2025 04:45 AM

पुणे - पुणे महापालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर येत आहेत, मर्जीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. प्रशासक काळात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असूनसुद्धा सत्ताधाऱ्यांचे त्यावर नियंत्रण नाही.

अशा स्थितीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डांबर खरेदी घोटाळा , सुरक्षा रक्षक नियुक्ती, नाले सफाई निविदांमधील घोळ यासह अन्य विषयांवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल असे स्पष्ट केले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध विषयासंदर्भात पाटील यांनी पुणे महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी येथील पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारकाच्या कामाची पाहणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधला.

प्रशासक राजवटीत पुणे महापालिकेचे नुकसान होणारे अनेक निर्णय होत आहेत. डांबर खरेदीत घोटाळा झाल्याचे पुरावे दिलेले असले तरी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. सुरक्षा रक्षक नियुक्ती आणि नवीन निविदेची प्रक्रिया यावरून आरोप झालेले आहेत. नाले सफाईच्या कामात रिंग करून कामे घेण्यात आली आहेत.

या बद्दल पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, मी कोथरूड मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली होती. शहराच्या विषयावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठक पार होते. महापालिकेतील गैरप्रकारासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. त्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

उशिरा जागा मिळत असल्याने भूसंपादनाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे बाणेर-बालेवाडी यासह कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंकचे रस्ते करण्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावेत अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

कोथरूडमध्ये पाणी पुरवठा विभागामार्फत कामे सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळित झालेला आहे. त्याबाबतही सूचना केल्या आहेत. पाषाण तळे सुशोभीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. बाणेर-बालेवाडी भागात नाट्यगृह बांधण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरु आहे, असे ही पाटील यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.