डोंबिवली - साधुचा वेश परिधान करून ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. राहुल घालनाथ भाटी उर्फ मदारी (वय-29), आशिष दिलीपनाथ मदारी (वय-20) आणि लखन आबा निकम (वय-34) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरेलेली कार जप्त केली आहे.
डोंबिवली जवळील खोणी पलावा येथे राहणारे माधव दिवाकर जोशी (वय-75) हे बुधवारी 16 एप्रिलला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भाजी घेऊन घरी पायी चालत जात होते. वेटलॅन्ड पार्क जवळून ते जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या कार मधून तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने साधुची वेशभूषा केली होती.
माधव यांना त्याने आपण साधू असल्याची बतावणी करत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळयातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व 10 ग्रॅम वजनाची अंगठी हातचलाखीने काढून घेत तेथून ते फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माधव यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी गाडीचा नंबर शोधून काढत तपासाची चक्र फिरवली. राहुल, आशिष व लखन यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना अटक करत त्यांच्याकडून माधव यांना बतावणी करून घेतलेली 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. या तिघांनी अजून काही गुन्हे केले आहेत का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.