Manchar News : आजारी आईला भेटण्यासाठी निघालेल्या तीन लाडक्या बहिणींवर ओढवला बिकट प्रसंग
esakal April 18, 2025 04:45 AM

मंचर - आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या एसटी गाडीमध्ये तीन लाडक्या बहिणी बसल्या. पण कळंब (ता. आंबेगाव) गावात एसटीचा थांबा नाही. नारायणगावपर्यंत तिकीट काढल्यास कळंबला तुम्हाला सोडतो असे आश्वासन वाहकाने दिल्यामुळे त्यांनी नारायणगावचे तिकिटे काढले.

पण बुधवारी (ता. १६) रात्री नऊच्या सुमारास या महिला प्रवाशांना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या झाडी जुडवाजवळ एकलहरे येथे रस्त्यावर सोडून एसटी गाडी पुढे निघून गेली.

सदर वाहक चालकाच्या बेपारवाईमुळे जीव मुठीत धरून घाबरलेल्या अवस्थेत महिला रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दीड किलोमीटरचे अंतर अंधारात कसे पार करायचे. ह्या चिंतेत असतानाच आलेल्या दोन पत्रकारांनी या लाडक्या बहिणींना सुखरूप घरी सोडले.

बहिणींवर ओढवलेला प्रसंग प्रसार माध्यमात व्हायरल झाला असून, वाहक चालकांच्या कार्यपद्धतीचा या भागातील गावकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पुणे ते नाशिक एसटी गाडीत (एम एच ०९, एफ. एल८२२१) मोशी येथे स्नेहा काशीद (वय-३९), विद्या वारीक (वय-४४) रूपा भोर (वय-१५) तिघी बसल्या. त्यांनी मंचरपर्यंत सुरुवातीला तिकीट काढले. पण मंचर येथून कळंबला जाण्याची सोय नसल्याचे पाहून वाहकाला विनंती केली.'

जर तुम्ही नारायणगावचे तिकीट काढले तर कळंबला सोडतो, असे सांगितल्यामुळे त्यांनी कळंब गावाच्याच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगाव पर्यंतच्या तिकिटाचे पैसे देऊन तिकीट घेतले. त्यांना वाटले रात्रीची वेळ असल्याने वाहक कळंबगावातून एसटी गाडी घेईल.

पण तसे न करता एकलहरेच्या मुख्य चौकातही न सोडता त्यांना थेट घोड नदीजवळ पुलाशेजारी नेहमी बिबट्याचा वावर असलेल्या व झाडी झुडपी असलेल्या ठिकाणी सोडले. सर्वत्र अंधार झाडाझुडपातून कसे जायचे या चिंतेत महिलाहोत्या. योगायोगाने तेथून पत्रकार आयुब शेख व पत्रकार अमोल जाधव जात होते. त्यांनी धीर दिला.

महिलांवर ओढवलेला प्रसंग प्रसारमाध्यमावर व्हायरल झाला असून एसटीतील वाहक व चालकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पत्रकारांनी त्यांना घरी सोडले.

दरम्यान आंबेगाव तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणपतराव क्षीरसागर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून संबंधित वाहक व चालकावर राज्य परिवहन महामंडळाने कारवाई करावी. या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

'पुणे _नाशिक एसटीच्या वाहक व चालकांनी माणुसकी दाखवली नाही. अरे रवी ची भाषा वापरली. तुम्ही येथे उतरला नाही, तर तुम्हाला नारायणगावला उतरावा लागेल. अशी दमदाटीची भाषा वापरली. त्यामुळे आम्ही काळोख्यात उतरलो. घाबरलेल्या अवस्थेत असतानाच तेथे पत्रकार आले त्यांनी धीर देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.'

- स्नेहा काशीद, प्रवासी कळंब (ता. आंबेगाव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.