Tamilnadu BJP AIDMK Alliance: तमिळनाडूतील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी (२०२६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्या युतीची घोषणा केली. यावेळी ‘अण्णाद्रमुक’चे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी हे देखील उपस्थित होते.
येथे आलेल्या शहा यांनी मायलापोरमध्ये त्यांचे राजकीय सल्लागार आणि ‘तुघलक’ या नियतकालिकाचे संपादक गुरुमूर्ती यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. गुरुमूर्ती यांच्यासोबतची चर्चा आटोपल्यानंतर शहा आयटीसी चोला या पंचतारांकित हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी युतीची घोषणा केली.
गृहमंत्री शहा म्हणाले की, अन्य पक्षांसोबत हातमिळवणी करूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार असून आम्ही ती जिंकून देखील दाखवू. या पत्रकार परिषदेला पलानीस्वामी यांच्यासमवेतच के.पी. मुनूस्वामी आणि एस.पी. वेलुमणी हे देखील उपस्थित होते. शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदीतूनच संवाद साधला. त्यांनी दिलेल्या उत्तराचा तमिळमध्ये अनुवाद करून सांगण्यात आले.
‘‘तमिळनाडूतील दोन्ही राजकीय पक्ष हे आधी आपला किमान समान कार्यक्रम निश्चित करतील आणि त्यानंतर २०२६ मधील विधानसभेची निवडणूक लढविण्यात येईल. इडाप्पडी रामास्वामी यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढली जाईल. दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या कारकीर्दीमध्ये देखील १९९८ मध्ये अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली होती. तेव्हा पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने ३९ पैकी ३० जागांवर विजय मिळविला होता. अण्णाद्रुमकने आमच्याशी युती करण्यापूर्वी कोणतीही अट घातली नव्हती,’’ असे शहा म्हणाले.
यावेळी काही पत्रकारांनी अण्णामलाई यांच्या हकालपट्टीचा मुद्दा उपस्थित केला होता पण ते राज्य भाजपचे प्रमुख असल्याने माझ्यासोबत येथे बसलेले असल्याचे शहा यांनी नमूद केले. राज्यात २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडली होती. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी द्रविडीयन नेते सी.एन. अण्णादुराई, एम.जी.रामचंद्रन आणि जयललिता यांच्यावर टीका केल्याने पक्षाने भाजपसोबत काडीमोड घेतला होता.