बहरला हा मधुमास नवा
esakal April 13, 2025 09:45 AM

- ऋचा थत्ते, rucha19feb@gmail.com

परीक्षेचे दिवस असायचे. त्यात कडक उन्हाच्या झळा झेलत घरी आलं, की अभ्यासापूर्वीचा थोडा वेळ मात्र छान जायचा. कारण माठातील पाणी घातलेलं थंडगार पन्हं मिळायचं. या पाण्यालाही वाळ्याचा गंध असायचा. कधी मोगरा पाण्यात टाकला, तर तो सुगंध आणखी वेगळा. पाण्याची ती मातकट चव आणि ते आंबटगोड पन्हं. उन्हाचा तडाखा आणि अभ्यासाचा ताण विसरायला व्हायचं.

मग अभ्यास करताना कानावर ते कुहू कुहू आलं, की तो क्षणही मन प्रसन्न करणारा असायचा. उन्हाच्या झळा आणि अभ्यासाच्या कळा सोसताना कळ्याही उमलत असायच्या आणि तो दरवळ जणू मन सुखावण्यासाठीच असायचा. ऋतुराज वसंताचं आगमन म्हणजे का कोण जाणे तेव्हाच्या अभ्यासाची आठवण. अर्थात अजून बरंच काही!

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे सहा ऋतूंचे सहा सोहळे सृष्टी साजरे करीत असते. त्यापैकी वसंत हा ऋतूंचा राजा मानला गेला आहे. भगवंतानेही ‘ऋतूंमध्ये मी वसंत आहे’ असं गीतेत सांगितलंय. वसंत म्हणजे पालवी, जगण्याची नवी उमेद आणि आशा. रंगपंचमीपासून या ऋतूची सुरुवात मानली जाते.

रंगपंचमीलाच लहान बाळाला पांढरे झबले घालून त्यावर केशराच्या पाण्याचे शिंतोडे उडवतात आणि गळ्यात द्राक्षाची माळ. ते गोड रूप डोळ्यात किती साठवू नि किती नाही असंच असतं. आणि बाहेर अवघी सृष्टीही रंगांची उधळण करीत असते. रंग अर्थात विविध फुलांचा आणि गंधही फुलांचाच.

गुढीपाडवा, रामनवमी, चैत्रगौरीचं हळदीकुंकू वा अक्षय्यतृतीया.. मोगऱ्याचे गजरे आणि हार मनातही दरवळत रहातात. चैत्रगौर म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हं हवंच. पन्ह्याचं वर्णन तर झालंच; पण थोडी जाडसर वाटलेली दाताखाली येणारी कैरीची डाळ तिच्या खास चवीमुळे मला तर फार आवडते. वरून दिलेली हिंगाची फोडणी, हळदीचा तो पिवळाधमक रंग, कैरीचा मुरलेला आंबटपणा.. अहाहा!

रस, रंग आणि गंध असा तृप्तीचा त्रिवेणी संगम! हीच कैरी संध्याकाळी भेळेचीही लज्जत वाढवते. आणि नुसतं तिखट-मीठ लावून कैरी खाणे हाही सोहळा असतो. कैरी, द्राक्ष, कलिंगड सगळ्याचा आस्वाद घेतोच; पण त्यातही आंबा. ऋतूंचा राजा आणि फळांचा राजा जणू गळाभेट घेतात. आमरसाचा सोहळा तर घरोघरी व्हायला हवाच आणि फोडी करूनही आंबा चापायला हवाच.

हा सगळा आनंद सुट्टीत घरी बसून घेताना वाळवणंही केलेली आठवतात. पापड, कुरडया, लोणची, पापड्या, सांडगे, खारवलेली मिरची... असे किती प्रकार असतात. आता हे घरोघरी होत नसलं, तरी लहानपणीच्या आठवणी मात्र नक्कीच ताज्या आहेत.

याच दिवसात भरउन्हात बाहेर पडायची वेळ आली, तर घुंगरांचा नाद दिलासा देतो. अर्थात उसाच्या गुऱ्हाळाकडे पावलं वळतात. ‘आमचे येथे उसाचा रस मिळेल’ अशी पाटी पाहून आपण स्थानापन्न होतो आणि चवीचवीने आस्वाद घेतो. एखादी झुळूक आलीच, तर अजूनच सुख!

असेच एकदा रसाचे घोट घेताना समोर पाहिलं, तर ‘वाहवा’ असा उद्गार आपोआप उमटला. समोर पिवळाधम्मक बहावा सजून डौलात डोलत होता. त्याच्या सावलीचीही सुंदर नक्षी दिसत होती. साहजिकच इंदिरा संत यांची कविता आठवली.

नकळत येती ओठांवरती

तुला पहाता शब्द वाहवा

सोनवर्खिले झुंबर लेऊन

दिमाखात हा उभा बहावा

आपल्या सर्वांच्या नजरेला दिसणारं हेच झाड इंदिराबाईंच्या दृष्टीतून पहायलाच हवं. त्यांना इथे चक्क नववधूचं दर्शन घडतं. त्या म्हणतात-

कधी दिसे नववधू बावरी

हळद माखली तनू सावरते

झुळुकीसंगे दल थरथरता

डूल कानीचे जणू हालते

म्हणजे त्या सोनसळी पिवळ्या रंगात त्यांना नववधूची हळदमाखली कांती दिसली आणि फुलांच्या आकाराला साजेशी तिच्याच डुलाची नेमकी उपमाही त्यांना सुचली. याच कवितेतील अजून एक उपमा तर फारच विलक्षण आहे.

पीतांबर नेसुनी युगंधर

जणू झळकला या भूलोकी

पुन्हा एकदा पार्थासाठी

गीताई तो सांगे श्लोकी

तोच पीतवर्ण म्हणजे अर्जुनाला गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचा पीतांबर! किती भव्य कल्पना सुचावी. वसंतात मनालाही पालवी फुटते ती अशी. वसंताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोकीळकूजन.

भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गाऽ कोकीळा गाऽ इतका तो स्वर्गीय स्वर! जणू भूलोकीचा गंधर्वच. त्यानेही आपल्या गायनमैफलीसाठी ऋतू निवडला तो वसंतच.

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।

वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः॥

अर्थात कावळा आणि कोकीळ दोघेही काळेच, जवळपास सारखेच दिसतात; पण खरा फरक कळतो तो वसंत आल्यावर, कोकीळ गाऊ लागल्यावर.

या कोकीळकूजनाची महती अशी, की दैवी सूर लाभलेल्या लतादीदींनाही आपण गानकोकीळा म्हणून संबोधतो; पण दोघांमधील फरक हाच, की तो कोकीळ केवळ वसंतात गातो आणि गानकोकीळेच्या गायनाने आपण सहाही ऋतूंत वसंतच अनुभवतो.

जसे निसर्गाचे ऋतू असतात तसे मनाचेही असतात. कवींच्या शब्दांना मनाला बहर येतो तो असा. कविवर्य सुधीर मोघे म्हणतात,

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो

तरीही वसंत फुलतो...

वसंत आपल्याला पानगळ विसरून नव्याने बहरायला शिकवतो. शिवाय निसर्ग किती भरभरून देत असतो.

परोपकाराय फलन्ति वृक्षः

परोपकाराय वहन्ति नद्यः ।

परोपकाराय दुहन्ति गावः

परोपकारार्थमिदं शरीरम् ॥

झाडं, नद्या, गाई हे जसं इतरांना फळं, पाणी, दूध देण्यासाठीच जगतात, कार्यरत रहातात. आपला मनुष्यजन्मही इतरांसाठीच झिजवावा. असं हे सुभाषित सांगतं. हे सदासर्वकाळ आपल्याला शक्य होणार नाही हे गृहित धरून आपल्या संस्कृतीत खास दिवसांची योजना आहे. तसाच वसंत ऋतूतील अक्षय्य तृतीयेचा दिवस. या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे.

‘आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही’ असं बहिणाबाईही सांगून गेल्यात. या दिवशी जे दान देऊ, त्याचा आपल्याकडे कधीच क्षय होत नाही, असंही मानतात. दान म्हटल्यावर केवळ पैसा नव्हे, तर कोणत्याही रूपात केलेली मदत असा व्यापक अर्थही घेता येईल. विंदांचे शब्द आठवतात.

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे

मला तर वाटतं वसंतही सहस्र कराने देत असतो. त्यालाही दोन हात मागावे. आणि त्याआधारे यथाशक्य भवताल बहरत ठेवावे. मधुमासाचे माधुर्य त्यामुळे खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होईल, नाही का?

(लेखिका निवेदिका-व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.