Shri Kshetra Mahrudra Maruti Mandir: तालुक्यातील जहाँगीरपूर हे श्रीक्षेत्र महारुद्र मारोती देवस्थान गेल्या कित्येक वर्षांपासून हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान ठरत आहे. खूद्द ड्रिमगर्ल हेमामालिनी यांना येथील महारुद्र मारोती पावल्याने त्यांनी तब्बल दोनवेळा मंदिरात येऊन दर्शन घेतले. तसेच दिलीप कुमारसह अनेक दिग्गज कलाकारांनी या मंदिरात येऊन मारुतीचे दर्शन घेतले आहे.
श्रीक्षेत्र जहाँगीरपूर येथे एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीला दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळते. काही भक्तांच्या मते जहाँगीरपूरच्या हनुमानजीच्या मंदिरात त्यांना साक्षात्कार झाला आहे. एक प्रचंड बलदंड शक्ती केंद्र महारुद्र हनुमान मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. विश्वस्त मंडळी मंदिराच्या प्रगतीकरिता अथक परिश्रम घेत आहे. जिल्ह्याकरिता ही एक गौरवाची गोष्ट असून दिवसेंदिवस होणारा मंदिराचा विकास श्रद्धेची पावती आहे. या मंदिरामुळे गावातील मंडळींना रोजगार उपलब्ध झाले.
जहागीरपूरच्या हनुमंताची वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात प्रवेश करताच प्रसन्न मूर्तीचे दर्शन होते. ही मूर्ती साडेचार फूट उंच आहे. मूर्तीसमोर ८१ तोळ्यांचे चांदीचे सहा इंच सुंदरसे नेत्र आहे. १३ किलो चांदीचा मुकूट असून दर शनिवारी उत्सवाप्रसंगी मूर्तीवर ठेवल्या जातो. या स्वरूपात मूर्ती अतिशय देखणी दिसते. त्यामुळे मूर्तीकडे पाहूनच भाविकांची डोळे तृप्त होतात.
याठिकाणी हनुमान जयंतीला लाखो रुपयांचे नारळ विकल्या जातात. जयंतीला भक्तांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रोज येणारे भक्त तन-मन-धनाने मंदिराच्या विकासासाठी दान करतात. यामुळेच आज संपूर्ण मंदिराच्या परिसरातील विकास होऊन कायापालट झाला आहे.
या मंदिरात मुंबई-नागपूरपासून ते गोंदिया, शिंदवाडा, परराज्यातून देखील भक्तगण मोठ्या प्रमाणात दाखल होतात. अशी ही दर्शनीय महारुद्र हनुमानजीची मूर्ती तिवसा मतदारसंघात श्रीक्षेत्र जहागीरपूर याठिकाणी वसलेली आहे. मंदिराला लागूनच राममंदिर आहे. वर्षानुवर्षे मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढतच आहे.
गोरक्षण शाळामहारुद्र मारुती संस्थान जहागीरपूर येथे गोरक्षण शाळा आहे. भक्तांनी दान केलेल्या यामध्ये ५० गायी असून त्यांचा चारापाणी संस्थानच्या वतीने करण्यात येतो. मंदिर परिसरात मंदिर, गोशाळा, सभागृह, निवासस्थान, भोजनालय व निसर्गरम्य असे वातावरण या परिसरात भाविकांना पाहायला मिळते.
हेमामालिनी यांनी दिली भेटप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी या १९९० मध्ये अमरावती येथे आल्या असता त्यांनी श्रीक्षेत्र जहागीरपूर महारुद्र मारुती संस्थान येथे येऊन दर्शन घेतले व इच्छा व्यक्त केली. त्यानंतर १९९१ मध्ये त्या परत आल्या. मारडा व जहागीरपूर या तीन किलोमीटर रस्त्याचे काम सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी, राज्यमंत्री सुधाकर नाईक, अमरावतीचे पालकमंत्री अनिल वऱ्हाडे यांच्या पाठपुराव्यातून झाले.
हनुमानजी येथे स्वयंभू प्रकट झालेले आहेत. चारशे वर्षांचा येथील इतिहास असून अनेकांचे कुलदैवत असल्यामुळे अमरावती, यवतमाळ, वर्धा येथील हनुमान भक्त नियमित याठिकाणी दर्शनासाठी येतात.
- ओमप्रकाश परतानी, मंदिर अध्यक्ष.