Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी 'एक्स'वर एक पोस्ट केली असून ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये एक बकऱ्याचा फोटो ठेवत त्यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे. खबर पता चली क्या? एसंशि गट असा सवाल त्यांनी त्यात उपस्थित केला आहे.
आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना या ट्विटचा नेमका अर्थ विचारला. यावेळी, त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिले. परंतु स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तुम्हीच अभ्यास करा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
एक्स पोस्टवरुन राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याला सांगितले आहे की फार शहाणपणा करु नको. गप्प बस. फक्त बे बे करत राहा, असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकऱ्याला सांगितले आहे. त्यानंतर त्या ट्विटवर खाली लिहिलेले ए सं शी गट लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? असे विचारल्यावर ते तुम्हीच शोधा असं उत्तर राऊतांनी दिलं.
हनुमान जयंती निमित्त ज्या शोभायात्रा निघाल्या त्यावर यांनी टीका केली. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा अशा पद्धतीने निघत नाही. चर्च, मशिदीसमोरुन कधी शोभायात्रा काढण्यात येत नव्हती. या माध्यमातून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहेत. त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे. ते काय पंडित नेहरूंप्रमाणे जसे ते प्रतापगडावर मोटारीने पुढे गेले आणि चालत गेले. तसे तर येत नाहीत ते, तिथे महायुतीचा जेवणाचा जंगी कार्यक्रम असल्याचं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शनिवारीयांची भेट घेतली होती. त्याबद्दल राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना शाह यांना भेटावे लागणार आहे. त्यामुळे ते भेटले असतील असं राऊत म्हणाले.