दुचाकींची चोरी छत्रपती संभाजीनगरात, विक्री परभणीत…
Marathi April 13, 2025 12:24 PM

परभणीहून रेल्वेने प्रवास करून दर शनिवारी शहरात येऊन एमजीएम रुग्णालय, मिनी घाटी परिसरातील दुचाकी लंपास करण्याची वारी करणाऱ्या चोरट्याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी हस्तगत केल्या. यापैकी 14 दुचाकी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेवडी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील एकनाथ महादू मुंडे (27) असे चोरट्याचे नाव आहे. त्याचे वडील महादू मुंडे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कामाला होते. त्यामुळे एकनाथचे प्राथमिक शिक्षण शहरात झाले आहे. त्यामुळे त्याला शहराची चांगलीच ओळख व माहिती होती. या माहितीचा फायदा घेत त्याने शहरात चोरी करण्याचा निर्णय घेतला. एकनाथने जून 2024 मध्ये एमजीएम रुग्णालयासमोरून पहिली दुचाकी चोरली. या दुचाकी चोरीचा तपास त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे त्याने हाच उद्योग पुढे सुरू ठेवला. मागील वर्षभरात एमजीएम रुग्णालय, मिनी घाटी या परिसरातून तब्बल 26 दुचाकी त्याने लांबविल्या. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी झाल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी रुग्णालयासमोर उभ्या केलेल्या दुचाकींवर लक्ष ठेवले. सिडको पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, या भागातील दुचाकीचोर हा एकनाथ महादू मुंडे हा आहे. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिंतूर गाठले. जिंतूर बसस्थानकावर दुचाकी विक्रीसाठी आलेल्या एकनाथ मुंडेला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी एकनाथला दुचाकी चोरीबाबत विचारणा केली, परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी जिंतूर येथील एमआयडीसी भागात ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता होंडा कंपनीच्या शाईन 7, हीरो कंपनीच्या एचएफ डिलक्स 6, स्प्लेंडर 5, ड्रोम युगा 1, युनिकॉन 1, सुपर स्प्लेंडर 1 अशा तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींची किंमत 23 लाख 40 हजार रुपये आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीच्या चेसिस नंबरवरून चौकशी केली असता सिडको पोलीस, एमआयडीसी सिडको, इंदापूर (जि. पुणे) येथील पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उपायुक्त स्वामी यांनी दिली.

दहा महिन्यांत 26 दुचाकी जप्त

एकनाथ याने दुचाकी चोरी करण्याचा निर्णय घेऊन जून 2024 मध्ये पहिली दुचाकी पळविली. त्यामुळे दरशनिवारी सुटीच्या दिवशी रेल्वेने परभणी येथून शहरात दाखल व्हायचा. त्यानंतर रिक्षाने एमजीएम किंवा मिनी घाटी परिसरात जायचा. तेथे गाडी हेरून बनावट चावीने चालू करून गावाकडे घेऊन जायचा. चोरीच्या गाड्या विक्रीसाठी तो वेगवेगळी खोटी कारणे सांगून गाडीची किंमत कमी करून नातेवाईकांना विक्री करायचा. गेल्या दहा महिन्यांत 26 दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.

या पथकाने केली धडाकेबाज कामगिरी

पोलीस आयुक्तालयात दुचाकी चोरीचा सपाटा सुरू आहे. या दुचाकी चोरीला आळा घालण्यात ठाण्याअंतर्गत पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्यावर तपासाचे काम पोलीस आयुक्तांनी सोपविले होते. पोलीस निरीक्षक गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, नवनाथ खांडेकर, योगेश नवसारे, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, अमोल मुगळे, चालक पोलीस अंमलदार संतोष चौरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली. यावेळी पत्रकार परिषदेत सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचीदेखील उपस्थिती होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.