आपलं लक्ष आता BMC, पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांची गर्जना
Marathi April 13, 2025 11:25 PM

आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका, पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. साळवींची सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर भेटीला गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सुधीर साळवी यांना सचिवपद दिलं आहे. लालबाग, परळ आणि वरळी म्हटल्यानंतर कट्टर शिवसैनिक हा आलाच. काल, परवा बातम्याही आल्या की, उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी केली. आमच्या खेळी मोठ्याच असतात. आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे. त्यासाठी मी सुधीर यांना शिवसेनेचं सचिवपद दिलं आहे. सुधीर यांना आता मी आणखी मुंबईमध्ये इकडं, तिकडं सगळीकडे पळवणार आहे. सगळ्यांनी साथ, सोबत द्यावी आणि असेच सगळे आनंदी राहा. सगळे एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा. एकजुटीने राहा. आपल्यावरती जे काही एक वेगळं संकट आलं आहे, केवळ शिवसेनेवरती नाही तर, महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आणि मराठी अस्मितेवरती येत आहे, ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून आपली एकजूट पाहिजे. मला खात्री आहे, तुम्ही त्या पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.