'अस्तित्वा'चे सौंदर्य
esakal April 15, 2025 01:45 PM

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सरशी लढाई ही केवळ शरीराशी नसते - ती मनाशीसुद्धा असते. शरीरावरच्या जखमा दिसतात; पण मनावरच्या? त्या नजरेआडच राहतात. स्तन हा केवळ शरीराचा भाग नव्हे, तर अनेकांच्या दृष्टीनं स्त्रीत्वाचं प्रतीक, सौंदर्याचं मानलं गेलेलं आभूषण. निसर्गानं दिलेली गोष्ट आजारामुळे गमवावी लागते, तेव्हा ती हानी केवळ शारीरिक नाही, तर खोलवर मनात घुसलेली असते.

कॅन्सर अवेअरनेसवर मी काम सुरू केलं, तेव्हा अनेक महिलांना भेटत होते. एका कॅन्सर पेशंटला मी कौन्सिलिंग करत होते. ती काहीच बोलत नव्हती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिला जवळ घेऊन धीर दिला. तिच्या डोळ्यांतून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शांतपणे माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, ‘शरीरावरून प्रेम बदलतं का?’

‘मी लढू शकते कॅन्सरशी... पण नवऱ्याच्या नजरेत जिथे आता ‘मी सुंदर उरलेली नाही’, तिथे रोज मेलेली वाटते स्वतःशीच! ब्रेस्ट गेले. तो म्हणतो, ‘आकर्षण गेलं.’ डोक्यावर केस नाहीत. म्हणतो, ‘तुझ्याबरोबर बाहेर जायला संकोच वाटतो.’

तिचे हे शब्द ऐकून मी थोडीशी सुन्न झाले. शरीराची जखम ही खरी नाही- जखम तर नजरेत झालीय. तिनं विचारलं, ‘तू सांग. प्रेम हे केसांवर असतं का? की त्या केसांच्या आत असलेल्या माझ्या मनावर? मी अजूनही तितकीच हसते, तितकीच काळजी घेते, मग... मी का त्याला कमी भासतेय आता?’

माझ्याकडे उत्तर नव्हतं; पण तिच्या बाजूनं उभं राहणं होतं. मी तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘आपण अजूनही सुंदरच आहोत. हो! डोक्यावरचे केस गेले, स्तन शस्त्रक्रियेतून काढावे लागले, तरी आपण अजूनही सुंदर आहोत.’

सौंदर्य म्हणजे केवळ एखाद्या आरशात दिसणारं प्रतिबिंब नाही. ते असतं आपल्या डोळ्यांमधल्या चमकदार आशेमध्ये, हसण्यातल्या धैर्यात आणि प्रत्येक वेळी उठून उभं राहणाऱ्या इच्छाशक्तीत. आजही आपला चेहरा तेजस्वी आहे- कारण त्यावर माया आहे, प्रेम आहे आणि अनुभवांनी घडलेली शांतता आहे. सौंदर्य हे केसांत नाही, ते आपल्या विचारांत आहे. सौंदर्य हे स्तनांत नाही, ते आपल्या मनगटातल्या ताकदीत आहे... आणि सौंदर्य हे बाह्य गोष्टींमध्ये नाही,ते आपल्या आत, आपल्या अस्तित्वात आहे.

प्रिय पुरुषांनो, नवऱ्यांनो.. ज्या स्त्रीशी तुम्ही लग्न केलं, ती आता तशीच आहे; पण अधिक ताकदवान, अधिक सुंदर. कदाचित तिचे केस गेले असतील, कदाचित शरीरावरच्या काही खुणा राहिल्या असतील, कदाचित स्तनांचा आकार बदलला असेल; पण तिचं सौंदर्य अजूनही तसंच आहे - किंबहुना, आता ते अधिक झळाळून निघालं आहे. तिनं फक्त आजारावर नाही, मृत्यूच्या भीतीवरही मात केली आहे. ती आता केवळ ‘तुमची पत्नी’ राहिलेली नाही, ती ‘एक योद्धा’ बनली आहे.

तिच्यावरचं प्रेम तिच्या अवयवांवर नव्हे, तर तिच्या मनगटातल्या धैर्यावर, तिच्या डोळ्यातल्या आशेवर आणि तिच्या हसण्यातल्या जिद्दीवर असावं.

तिला सांगावं, ‘तू अजूनही सुंदर आहेस, किंबहुना, आता अधिकच.’ कारण सौंदर्य फक्त दिसण्यात नाही... ते संकटातून उभं राहण्यात असतं.

स्त्री ही फक्त शरीर नाही – ती भावना आहे, ती सोबत आहे. कॅन्सर झाल्यावर शरीर बदलतं...पण प्रेम, सन्मान आणि आपुलकी यांना बदलायचं कारण नसतं.

तिच्या सौंदर्यातून स्तन गेले, तिच्या गालावरून तेज ओसरलं, तरी ती तीच असते ना? जिनं तुझ्यासाठी स्वयंपाक केला, घर सांभाळलं, पोरं वाढवली, स्वप्नं उभी केली, तीच व्यक्ती आज आपल्या शरीराशी झुंज देत असेल, तर तिच्याप्रतीचं आपलं प्रेम बदलायला हवं का?

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी हा प्रश्न समाजानं विचारायलाच हवा, ‘तिचं अस्तित्व, तिची किंमत, तिचं सौंदर्य... ते फक्त शरीरावर अवलंबून असावं का?’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.