कल्याण: कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने रविवारी पहाटे नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. विशाल गवळी (Vishal Gawali) याने तुरुंगातील शौचालयात गळफास लावून घेतल्याने त्याचा मृ्त्यू झाल्याची माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत तळोजा तुरुंगातील या घटनेची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी विशाल गवळी याच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला आहे. विशाल गवळी याची हत्या झाल्याचे त्यांनी म्हटले. (Kalyan Crime Case)
विशाल गवळी याला बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणे मारण्यात आले. विशाल गवळी याने आत्महत्या केलेली नाही. त्याला तुरुंगात कोणीतरी मारले आहे, असे गवळीचे वकील संजय धनके यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकारानंतर विशाल गवळीचे नातेवाईक नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात गेले आहेत. मात्र, सध्या विशाल गवळीचा याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालातून काय समोर येते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, विशाल गवळी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तर कल्याण परिसरात नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशाल गवळी या नराधमाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त येत आहे. मात्र त्या ऐवजी सरकारने आरोपीला अटक झाल्यापासून तीन महिन्याच्या आत त्याला फासावर लटकवले असते तर त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली असती. गुन्हेगारांना वचक बसविण्यासारखी त्याला तातडीने फाशी देणे हेच योग्य होते. मात्र त्याने कारागृहात आत्महत्या केली, यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा आनंद झालेला नाही. जर त्याला भर चौकात फाशी दिली असती तर आम्ही नक्कीच आनंद साजरा केला असता, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी मोर्चा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली आहे.
विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबिरीला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजन केले. आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केले, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केले होते, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत ‘जशास तसा’ न्याय झाला, असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=vcsdonufbci
आणखी वाचा
नराधम विशाल गवळीने गळफास घेतल्याचे समजताच वडिलांनी मुलीच्या फोटोला हार घातला, म्हणाले, देवाने….
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या
अधिक पाहा..