आयपीएल 2025 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात रेकॉर्डब्रेक खेळी पाहायला मिळाली. पंजाब किंग्सने दिलेल्या 245 धावांचा पाठलाग करताना मैदानात अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड नावाचं वादळ घोंघावत होतं. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात दोन गडी गमवून दिलेलं लक्ष्य गाठलं. अभिषेक शर्माने या सामन्यात 55 चेंडूत 141 धावांची वादळी खेळी केली. या सामन्यानंतर अभिषेक शर्माने एक खुलासा केला आहे. शुबमन गिलमुळे शतक शक्य झाल्याचं सांगितलं. अप्रत्यक्षरित्या शुबमन गिल अभिषेक शर्मासोबत मैदानात होता. सामन्यात अभिषेक शर्मा शुबमन गिलची बॅट घेऊन मैदानात उतरला होता. त्याच बॅटने त्याने शतक ठोकलं. ‘सर्वांना माहिती आहे की मी कोणाच्या बॅटने सामना खेळलो. मी शुबमन गिलच्या बॅटने ही खेळी केली. मला वाटते की आज माझा लकी दिवस होता.’
शतकी खेळीनंतर अभिषेक शर्माने शुबमन गिलचे आभार मानले. यापू्र्वीही अभिषेक शर्माने खुलासा केला होता की, जेव्हा फॉर्म नसतो तेव्हा तो गिलच्या बॅटने खेळण्यासाठी उतरतो आणि पु्न्हा धावा होतात. यापूर्वीही असं पाहायला मिळालं होतं. अभिषेक शर्माने आपल्या शतकी खेळीत 10 षटकार आणि 14 चौकार मारले. पंजाब किंग्सच्या सामन्यापूर्वी आधीच्या पाच सामन्यात त्याने फक्त 51 धावा केल्या. यात सर्वाधिक धावा या 24 होत्या. त्याने पाच डावात 24, 6, 1, 2 आणि 18 धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माने आपल्या दमदार खेळीचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं. अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘वडील अंडर 14 पासून माझ्या प्रत्येक सामन्यात येतात. आजही ते स्टेडियममध्ये होते. मी वारंवार त्यांच्याकडे पाहात होतो. ते इशाऱ्यात सांगत होते की कोणता शॉट्स खेळायचा आहे. ते माझे पहिले कोच आहेत.’ जेव्हा आई वडील मैदानात असतात तेव्हा खेळी अजून भक्कम होते. अभिषेकच्या वडिलांनी सांगितले की “गेल्या काही सामन्यांमध्ये तो दुर्दैवी होता, तो धावबाद झाला. पण मला खात्री होती की तो आज शतक करेल. तो सकाळपासूनच सांगत होता की आज मी धावा करेन आणि हैदराबादला विजय मिळवून देईन.”