Sanjay Ghatge to join BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता कोलाहपूरच्या कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कागलचे माजी आमदार संजय घाटगे हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असून लवकरच ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत.
विशेष म्हणजे त्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून ते उद्या म्हणजेच 15 एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते ठाकरेंची साथ सोडणा आहेत, अशी चर्चा होती. लवकरच ते भाजपात जातील, असेही भाकित तेथील राजकीय जाणकार व्यक्त करत होते. आता हेच भाकित खरे ठरणार असून ते फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार संजय घाटगे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अंबरीश घटगे हेदेखील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पिता आणि पुत्र हे दोघेही ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे कोल्हापुरात ठाकरेंना हा मोठा धक्का समजले जात आहे.
कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय असतो. या मतदारसंघातून 1998 सालच्या निविडणुकीत घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केले होते. त्यानंतर मात्र 1999, 2004, 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलं होतं. त्यांनी शिवसेना पक्षाकडून एकूण चार वेळा निवडणूक लढवलेली आहे. तर एका निवडणुकीत ते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.
संजय घाटगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा जोमाने प्रचार केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केले होते. चार महिन्यांच्या अंतराने झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता घाटगे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.