BJP Meeting : भाजपच्या बूथ समित्यांच्या रचनेचे काम रखडले, मुंबईतील बैठकीत घेतला आढावा
esakal April 16, 2025 06:45 AM

पुणे : पुणे शहरातील आठ मतदारसंघात भाजपला २७ मंडल अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आज (ता. १५) मुंबईत बैठक पार पडली. मंडल अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी मतदारसंघातील किमान ५० टक्के नवीन बूथ समित्या स्थापन करण्याचे काम अपूर्ण आहे. एका आठवड्याच्या आत बूथ रचनेचे काम पूर्ण करा असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान आठवड्याच्या शेवटी मंडल अध्यक्षांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंडल अध्यक्ष निवडीसाठी मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या भाजपच्या संघटनेची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरु आहे. सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी नंतर बूथ समित्या, मंडल अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी एका विधानसभेसाठी एक मंडल अध्यक्ष कम करत होता. पण पक्षाचा विस्तार झाल्याने प्रत्येक १०० बूथमागे एका मंडल अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यानुसार पुणे शहरात २७ मंडल अध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण बूथपैकी किमान ५० टक्के बूथ समित्यांची नव्याने रचना होणे आवश्यक आहे, त्यानंतरच निवडणूक घेता येते.

या बैठकीत शहरातील बूथ समित्यांच्या निवडीचा आढावा घेण्यात आला. हडपसर व वडगाव शेरी या मतदारसंघातील बूथ समितीची नव्याने रचना करण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. उर्वरित मतदारसंघात ५० टक्क्याच्या जवळपास बूथ समित्यांची रचना झालेली आहे. सर्वच मतदारसंघातील काम त्वरित पूर्ण करा अशी सूचना बैठकीत देण्यात आली. २० एप्रिल रोजी शहरातील मंडल प्रमुखांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या मर्जीतील अध्यक्ष

मंडल अध्यक्षांची निवड करताना प्रत्येक मंडलासाठी तीन नावे प्रदेशाकडे पाठवली जातात, त्यातील एका नावाची निवड केली जाईल. काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या जवळचा कार्यकर्ता मंडल अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले, पण आगामी महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळवताना त्रास होऊ नये यासाठी माजी नगरसेवकांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. आमदारांनी त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची नावे अंतिम तीनमध्ये घेतल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.