भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतरही भारतीय संघातील खेळाडू व्यस्त राहणार आहेत. कारण जवळापास प्रत्येक महिन्यात क्रिकेट मालिका आहेत. आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. त्यानंतर भारताला बांगलादेशचा दौरा करायचा असून या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
बांग्लादेश दौऱ्यावर ऑगस्ट महिन्यात जायचे आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणार आहे. हे सामने आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. याचे वेळापत्रक मंगळवारी (१५ एप्रिल) बीसीसीआयने जाहीर केले आहे.
भारतीय संघाचा दौरा १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून पहिली वनडे मालिका खेळवली जाईल. १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान वनडे मालिका होईल. त्यानंतर २६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांमधील सामने मिरपूर आणि चितगाव येथे पार पडतील.
१७ ऑगस्ट - पहिला वनडे सामना, मिरपूर
२० ऑगस्ट - दुसरा वनडे सामना, मिरपूर
२३ ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, चितगाव
२६ ऑगस्ट - पहिला टी२० सामना, चितगाव
२९ ऑगस्ट - दुसरा टी२० सामना, मिरपूर
३१ ऑगस्ट - तिसरा टी२० सामना, मिरपूर
बांगलादेश आणि भारत आत्तापर्यंत वनडेमध्ये ४२ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील ३३ वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर ८ वेळा बांगलादेशने विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी२० मध्ये हे दोन संघ १७ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील १६ वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर एकदा बांगलादेशने विजय मिळवला आहे.