आयपीएल 2025 स्पर्धेच्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धोबीपछाड दिला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. मात्र असं होऊनही सर्व काही चुकत गेलं. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. इतकंच काय तर पंजाब किंग्स संघाला 20 षटकंही पूर्ण खेळता आली नाही. पंजाबचा संघ 15.3 षटकात 111 धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 112 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान कोलकाता सहज गाठेल असं वाटत होतं. पण पंजाबने तसं होऊ दिलं नाही. पॉवर प्लेमध्ये दोन मोठे धक्के दिले. पंजाब किंग्सने कमबॅकसाठी सर्वस्वी पणाला लावलं होतं. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांना धाव सावरला आणि सावध खेळी केली. पण ही जोडी फुटली आणि सर्व काही धडाधड कोसळलं.
कोलकाता नाईट रायडर्सकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात आली होती. पण सुनील नरीन 4 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकही काही खास करू शकला नाही. डी कॉक फक्त 2 धावा करून बाद झाला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी साजेशी खेळी केली. पॉवर प्लेमध्ये 55 धावांपर्यंत मजल मारून अर्ध लक्ष्य गाठलं होतं. 62 धावांपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. कोलकात्याचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सर्वच गोलंदाजांना कमाल केली होती. हार्षित राणाच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाब बॅकफूटवर गेली. हार्षित राणाने 3 षटकात 25 धावा देत 3 गडी बाद केले. तर वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 21 धावा देत 2 गडी टिपले. सुनील नरीनला फलंदाजीत काही खास करता आलं नाही. पण गोलंदाजीत कमाल केली. त्याने 3 षटकात 14 धावा देत दोन गडी बाद केले. तर वैभव अरोरा आणि एनरिक नोर्त्जेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. पण या सर्वांवर युझवेंद्र चहल भारी पडला. त्याने पंजाबला या सामन्यात कमबॅक करण्यात यश मिळवलं.