भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी शहरात बेकायदा बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून केवळ कागदी घोडे नाचवत असून, तोडक कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, पण अशा प्रकारांमुळे करदाते नागरिक त्रस्त झाले असून, बेकायदा बांधकामांवर मेहरनजर दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे.
भिवंडी महापालिका हद्दीतील मौजे नागांव स.नं.११७, रावजीनगर, कल्याण रोड येथील कैलास कर्णकार यांच्या मालकीच्या जागेवर खतीजा कासिम यांनी पक्के विटांचे बांधकाम केले आहे. यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सरकारी कागदपत्रे तसेच बांधकाम विभागाची परवानगी नसताना पालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप जागामालक कैलास कर्णकार यांनी केला आहे. तसेच पाच महिन्यांपासून पालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठपुरावादेखील केला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक दोनचे कनिष्ठ अभियंता यांनी संपूर्ण बांधकाम बेकायदा असल्याचा अहवालही दिला आहे. तसेच १५ दिवसांत स्वःखर्चाने बांधकाम निष्कासित करावे अन्यथा महापालिका नियमाप्रमाणे कारवाई करेल, अशी नोटीसदेखील बजावली आहे, पण चार महिने उलटूनदेखील या प्रकरणात कोणताही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी आता थेट पालिका आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांच्याकडेच दाद मागण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------